Best News Portal Development Company In India

परिस्थितीवर मात करून ध्येय साध्य करा… ज्ञानेश्वर गव्हाणे यांचे युवकांना आवाहन

परिस्थितीवर मात करून ध्येय साध्य करा… ज्ञानेश्वर गव्हाणे यांचे युवकांना आवाहन

विकास-पर्यावरण समन्वयावर विद्यार्थ्यांचा युक्तिवाद…

वादविवाद स्पर्धेत लातूरच्या संघाला प्रथम क्रमांक

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

कुठल्याही परिस्थितीत खचून न जाता आपले ध्येय साध्य करणे गरजेचे आहे. त्यांनी यावेळी स्वतःच्या जीवन प्रवासातील संघर्ष आणि यशाचा प्रवास उपस्थितांसमोर रेखाटला. त्यांच्या या प्रेरणादायी मनोगतामुळे तरुणांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली असून, उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले. युवकांनी स्वतःला लाभलेल्या परिस्थिती आणि संघर्षावर मात करत यश संपादन केले पाहिजे. परिस्थितीवर मात करून ध्येय साध्य करा, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी केले.

येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात शिक्षण महर्षी माधवराव पाटील (काका) २५ वी राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा गुरुवारी (दि २४) रोजी पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गव्हाणे होते. यावेळी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. सतीश शेळके, परीक्षक डॉ. अनिता मुदकण्णा, डॉ. लक्ष्मण बिराजदार, डॉ. सन्मुख मुच्छट्टे, डॉ. सायबण्णा घोडके आदींची उपस्थिती होती.
ही स्पर्धा ‘आधुनिक भारताचा विकास आणि पर्यावरण संरक्षण याच्यात समन्वय आहे / नाही’ या विषयावर आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी विकासाची गती, पर्यावरणीय संतुलन, शाश्वत विकास, औद्योगिकीकरण आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन या मुद्द्यांवर अभ्यासपूर्ण व तर्कशुद्ध मते मांडली.

स्पर्धेत संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर येथील अरब बुशरा जिकर व विकास धनंजय बनजगोळे यांनी प्रथम क्रमांक पटकावत ११ हजार रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मिळविले. स्पर्धेच्या द्वितीय क्रमांकावर एम. पी. लॉ कॉलेज, छत्रपती संभाजीनगर येथील आदित्य ज्ञानेश्वर दराडे व प्रथमेश बळीराम गिरी यांनी बाजी मारली. त्यांना ७ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

तृतीय क्रमांक विधी महाविद्यालय, लातूर येथील ऋतुजा गोडबोले व दिशा राठोड यांनी मिळविला. त्यांना ५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. दरम्यान, उत्तेजनार्थ पारितोषिक (अनुकूल बाजू) महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथील गीता माधव वाडकर यांना, तर उत्तेजनार्थ पारितोषिक (प्रतिकूल बाजू) श्रमजीवी अध्यापक महाविद्यालय, उमरगा येथील अंकिता प्रदीप गायकवाड यांना देण्यात आले. दोन्ही विजेत्यांना प्रत्येकी २ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी विकास आणि पर्यावरण संरक्षण या दोन्ही बाबींचा परस्परसंबंध विविध उदाहरणांच्या आधारे स्पष्ट केला. पर्यावरणीय संवर्धनाचा विचार करून विकासाची दिशा निश्चित करण्याची आवश्यकता तसेच विकास प्रक्रियेत पर्यावरणीय जबाबदारीचे महत्त्व यावरही विद्यार्थ्यांनी भूमिका मांडल्या.

.कुमारी ऋतुजा गोडबोले, सुप्रीत फुलारी यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी डॉ. मुदकण्णा म्हणाल्या की, स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या चिकित्सक विचारशक्तीला, प्रभावी वक्तृत्वाला आणि समकालीन सामाजिक-पर्यावरणीय प्रश्नांकडे अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून पाहण्याच्या क्षमतेला व्यासपीठ मिळते. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. बिराजदार म्हणाले की, अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित होतात. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. गोपाळ कुलकर्णी यांनी केले.

सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. डॉ. जयश्री सोमवंशी यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india