Best News Portal Development Company In India

धडक कारवाई! धाराशिवमध्ये एलसीबीची मध्यरात्री धाड; मांडव्यात १७ लाखांचा मुद्देमाल जप्त, २२ जुगारी गजाआड! (दंगा काबू पथकासह एलसीबीचा छापासत्र; १४ गुन्ह्यांतील फरारी आरोपीसह दरोडेखोर जाळ्यात)

धडक कारवाई! धाराशिवमध्ये एलसीबीची मध्यरात्री धाड; मांडव्यात १७ लाखांचा मुद्देमाल जप्त, २२ जुगारी गजाआड!
(दंगा काबू पथकासह एलसीबीचा छापासत्र; १४ गुन्ह्यांतील फरारी आरोपीसह दरोडेखोर जाळ्यात)

तुळजापूर प्रतिनिधी:-
वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवा गावातील पारधी पिढीवर मध्यरात्री पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (LCB), दंगा काबू पथक आणि जलद प्रतिसाद पथकाने अत्यंत धाडसी व नियोजनबद्ध छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या २२ जुगाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या असून १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संवेदनशील वस्तीत पोलिसांचे नियोजनबद्ध ‘ऑपरेशन’
मांडवा येथील पारधी वस्ती अत्यंत संवेदनशील आणि आक्रमक वृत्तीची मानली जात असल्याने तेथे कारवाई करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. या ठिकाणी मोठ्या रकमेवर तिरट जुगार सुरू असल्याची गुप्त बातमी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना मिळाली होती.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एलसीबी, जलद प्रतिसाद पथक आणि दंगा काबू पथकाने अत्यंत गुप्तता बाळगून संपूर्ण परिसराला घेराव घातला आणि अचानक छापा मारला. पोलिसांचा धाडसी छापा पडताच जुगाऱ्यांची एकच पळापळ झाली; मात्र पोलिसांनी अत्यंत चलाखीने २२ जणांना रंगेहाथ पकडले.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल-
रोख रक्कम: ₹ २,४६,६००/-
चारचाकी वाहन: १ गाडी
मोबाईल फोन: १५ नग
इतर: जुगाराचे साहित्य
एकूण जप्त मुद्देमाल: ₹ १७,२६,६००/- १४ गुन्ह्यांतील फरारी आरोपी आणि दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात!
या कारवाईदरम्यान पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन सराईत व वांछित गुन्हेगारही पोलिसांच्या हाती लागले आहेत.
संतोष रमेश काळे (रा. मांडवा): हा तब्बल १४ चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला आरोपी आहे.
अतुल कालिदास काळे (रा. कन्हेरवाडी पाटी): हा वाशी पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, पोलीस अंमलदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, दत्ता राठोड, दया गादेकर, अशोक ढगारे, योगेश कोळी, महेबुब अरब, केदार तसेच आरसीपी व क्युआरटी पथकातील अंमलदारांनी सहभाग घेतला.
पोलीस प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail