शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् ३५ गावांना पाणी द्या! मंगरूळ ग्रामपंचायत सदस्य श्री. गोविंद डोंगरे व तुळजापूरच्या पंचायत समिती सदस्या सौ.सोनाली डोंगरे यांचे आदित्य ठाकरेंना साकडे!
तुळजापूर प्रतिनिधी:-
मराठवाड्यासह विशेषतः तुळजापूर तालुक्यात १००% दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी तातडीने दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी जोरदार मागणी मंगरूळचे ग्रामपंचायत सदस्य गोविंद डोंगरे आणि तुळजापूरच्या पंचायत समिती सदस्या सोनाली डोंगरे यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी माजी मंत्री, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या संपूर्ण मराठवाड्यात आणि विशेषत- तुळजापूर तालुक्यात अतिशय गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, यासाठी आपल्या माध्यमातून सरकारवर दबाव आणावा, अशी विनंती करण्यात आली.
३५ गावांचा उजनीच्या पाण्यात समावेश करण्याची मागणी-
तुळजापूर तालुक्यासाठी २ टीएमसी पाणी येणार आहे. मात्र, या योजनेमध्ये मंगरूळ आणि काटगाव या दोन जिल्हा परिषद गटांमधील तब्बल ३५ गावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे या ३५ गावांचा उजनीच्या या पाणी योजनेत समावेश करून त्यांना न्याय द्यावा, अशी विशेष विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे साहेब यांना दुष्काळग्रस्त पाहणी दरम्यान धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्याच्या शेतात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधताना हे निवेदन देण्यात आले तसेच निवेदन देताना महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







