Best News Portal Development Company In India

*पुस्तक वाचणाऱ्या गणरायाचा दहा दिवसांचा ‘ज्ञानोत्सव’ उत्साहात*

*पुस्तक वाचणाऱ्या गणरायाचा दहा दिवसांचा ‘ज्ञानोत्सव’ उत्साहात*
*गणरायाला पुस्तकांचे अर्पण, भाविकांनाही पुस्तकांचाच प्रसाद; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग*

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय आणि ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुस्तक वाचणाऱ्या गणराया’चा दहा दिवसांचा ज्ञानोत्सव उत्साहात पार पडला. गणेशोत्सवाला ज्ञान, विवेक आणि वाचनसंस्कृतीची जोड देणाऱ्या या उपक्रमात विविध राजकीय विचारांचे लोकप्रतिनिधी, अधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वाचनप्रेमी आणि नागरिक सहभागी झाले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही वाचनालयात ‘पुस्तक वाचणाऱ्या गणराया’ची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाला पुस्तके अर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले, तर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही प्रसाद म्हणून पुस्तके देण्यात आली. उत्सवात जमा झालेली पुस्तके वाचनालयात समाविष्ट करून वाचकांसाठी उपलब्ध केली जाणार आहेत.

मातोश्री शांताबाई चव्हाण यांच्या उपस्थितीत पहिल्या आरतीने उत्सवाची सुरुवात झाली. दहा दिवसांत आमदार प्रवीण स्वामी, नगराध्यक्ष किरण गायकवाड, उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, पंचायत समिती सभापती आकांक्षा चौगुले, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे व सौ. गीता भराटे, उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी पुष्पावती वायकुळे यांनी आरतीचा मान स्वीकारला.

तसेच केशव (बाबा) पाटील, विजय दळगडे, चैतन्य व पूनम कोंगुलवार, इरण्णा बसगुंडे, उमरगा रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल मदनसुरे, शिवशंकर व्हंडरे, शशीराज व स्नेहल पाटील तसेच अविनाश काळे यांच्या नेतृत्वाखाली उमरगा तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनीही आरतीत सहभाग घेतला. अनेक मान्यवरांनी गणरायाला स्वेच्छेने पुस्तके अर्पण केली.

विविध कार्यक्रमांना ॲड. शीतल चव्हाण, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. राजू बटगिरे, उपाध्यक्ष व्यंकट उर्फ राजू भालेराव, ॲड. अर्चना जाधव, ॲड. ख्वाजा शेख, प्रा. युसूफ मुल्ला, सत्यनारायण जाधव, रज्जाक अत्तार, संजय पवार, अनुराधा पाटील, स्नेहल पाटील, साक्षी चव्हाण, अंबादास जाधव, प्रदीप चौधरी, निसार औटी, वाघमारे, शंकर बिराजदार, माधव सूर्यवंशी, लक्ष्मण पवार, आकाश पोतदार, सुभाष पांचाळ, धानय्या स्वामी, प्रदीप पाटील, संदीप चौगुले, रोहित पवार, तेजस जाधव, ॲड. बालाजी सोमवंशी, योगेश तपसाळे, ज्ञानेश्वर सांगवे, शरद पवार, प्रदीप मोरे, शिवकांत पतगे, विजय चितली, पंकज बेलकोने, मयूर कटके, नागेश चलकुरे, सुजाता बसगुंडे, मारुती कोडते, अवंती भराटे, अनुज भराटे, साई व्हणाळे, कविता साळी व किशोर बसगुंडे यांच्यासह वाचक आणि फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

उत्सवादरम्यान चौथीतील वैष्णवी नागेश चलकुरे हिने वाचनालयाबद्दल स्वतःच्या हस्ताक्षरात अभिप्राय देत पाच स्टार्स दिले. तिच्या हस्ते चलकुरे परिवाराने वाचनालयाला पुस्तके भेट दिली. हा क्षण उत्सवाचे विशेष आकर्षण ठरला.

“राजकीय आणि वैचारिक मतभिन्नतेच्या पलीकडे जाऊन गणेशोत्सव सर्वसमावेशक पद्धतीने साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विविध विचार आणि क्षेत्रांतील माणसे गणरायासमोर आरती आणि पुस्तकाच्या निमित्ताने एकत्र आली, हेच या उपक्रमाचे खरे सौंदर्य आहे. गणरायाला अर्पण झालेली पुस्तके आता वाचकांच्या हाती जातील आणि ज्ञानाचा हा प्रसाद पुढेही वाटला जाईल,” असे वाचनालयाचे संस्थापक ॲड. शीतल शामराव चव्हाण यांनी सांगितले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india