नळदुर्ग महाविद्यालयात नव मतदार नाव नोदनी शिबीर संपन्न
———————————————-
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने नव मतदार नाव नोंदणी शिबिराचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला नळदुर्ग येथील अप्पर तहसील कार्यालयाचे तहसीलदार प्रमोद गायकवाड हे उपस्थित होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष राठोड सर होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. निलेश शेरे यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये भारतीय लोकशाही प्रगल्भ करायची असेल तर १८ वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक तरुणाने आपले नाव मतदार यादी मध्ये नोंद करणे गरजेचे आहे. आणि मतदार यादी मध्ये आपले नाव समाविष्ट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे अशा प्रकारचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी नळदुर्ग येथील अप्पर तहसील कार्यालयाचे तहसीलदा प्रमोद गायकवाड यांनी महाविद्यालयातील तरुणांना मतदानाचे महत्त्व समजले पाहिजे तसेच आज १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक तरुणांची मतदार यादी मध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी गाव पातळीवरती बी एल ओ च्या माध्यमातून तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मतदार यादी मध्ये नावे समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो तरी देखील काही तरुण यापासून वंचित राहतात आणि म्हणून शासनाच्या माध्यमातून महाविद्यालयांमध्ये देखील तरुणांमध्ये जर आपण मतदाराच्या संदर्भात जागृती निर्माण केली तर १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक तरुणाचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट होईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारची शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहेत असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ.सुभाष राठोड यांनी भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होता यावे यासाठी भारतीय राज्यघटनेने वयाची १ ८ वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार बहाल केलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले नाव मतदार यादी मध्ये समाविष्ट केले पाहिजे ही प्रत्येक तरुणांची जबाबदारी आहे. देशाचे भविष्य तरुणांच्या हातामध्ये आहे आणि जोपर्यंत हा तरुण जागरूक होत नाही,लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही तोपर्यंत देशाची प्रगती शक्य नाही असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ अशोक कदम व कार्यालयीन अधीक्षक श्री धनंजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ लक्ष्मण थिट्टे, डॉ. बृहस्पती वाघमारे, प्रा. बाबासाहेब सावते, डॉ. दीपक जगदाळे, डॉ. शिवतेज भोसले, प्रा. बालाजी क्षीरसागर, श्री. उमेश सर्जे, श्री. भागिनाथ बनसोड व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






