Best News Portal Development Company In India

कोट्यवधींचा निधी गेला कुठे? सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील उळेगाव पुलाला ८ दिवसांतच तडे; कंत्राटदारावर कारवाई न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा!

कोट्यवधींचा निधी गेला कुठे? सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील उळेगाव पुलाला ८ दिवसांतच तडे; कंत्राटदारावर कारवाई न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील उळेगाव येथील पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला हा पूल वाहतुकीसाठी खुला होऊन अवघे आठ दिवस झाले असतानाच, पुलाला मोठे तडे गेले असून तो खचल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले आहे. याप्रकरणी जबाबदार कंत्राटदार आणि अभियंत्यांवर तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास ‘शिवसेना स्टाईल’ने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, उळे गावाजवळील या पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले होते आणि आठ दिवसांपूर्वीच तो वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला होता. मात्र, कंत्राटदार आणि संबंधित इंजिनिअर यांनी संगनमत करून अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने आठच दिवसांत पुलाची ही दुरवस्था झाली आहे. अवघ्या आठ दिवसांत पुलाला तडे जाणे आणि पूल खचणे यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या व वाहनधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

​या गंभीर बाबीवर(ऊबाठा) शिवसेना उपतालुकाप्रमुख (तुळजापूर) प्रदीप मगर आणि उळे गावचे शिवसेना विभागप्रमुख सागर शिंदे यांनी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही जर काम इतक्या हलक्या दर्जाचे होत असेल, तर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या कामाची तात्काळ चौकशी करावी. दोषी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे आणि बेजबाबदार इंजिनिअरवर कडक कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.

​प्रशासनाने या कामाकडे दुर्लक्ष केल्यास आणि संबंधित कंत्राटदारावर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या वतीने महामार्गावर उतरून ‘शिवसेना स्टाईल’ने उग्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशाराही या वेळी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india