Best News Portal Development Company In India

धाराशिव एलसीबीची धडाकेबाज कारवाई! २७.६२ लाखांच्या मुद्देमालासह १३ गोमातांची सुटका; गोमांस तस्करांचे जाळे उद्ध्वस्त.

धाराशिव एलसीबीची धडाकेबाज कारवाई! २७.६२ लाखांच्या मुद्देमालासह १३ गोमातांची सुटका; गोमांस तस्करांचे जाळे उद्ध्वस्त.

​परंडा ते लातूर मार्गावर एलसीबीचा सापळा; दोन पिकअप व एक आयशर टेम्पो जप्त, वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

​तुळजापूर प्रतिनिधी;-
स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) गोमांस आणि गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या तस्करांवर मोठी धडक कारवाई करत तब्बल २७ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडाकेबाज कारवाईत कत्तलखान्याकडे नेण्यात येणाऱ्या १३ जर्सी गायींना सुरक्षित सोडवत जीवनदान देण्यात आले आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना, परंडा येथून गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस दोन पिकअप गाड्यांमध्ये भरून तसेच एका आयशर टेम्पोमध्ये १३ जर्सी गायींना कत्तलीसाठी भूम, पारडी व येरमाळा मार्गे लातूरकडे नेले जात असल्याची गुप्त बातमी मिळाली. बातमी मिळताच पथकाने पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांना माहिती देऊन वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावरील इंदापूर शिवारात तत्काळ सापळा रचला.

​संशयित वाहने येताच पोलिसांनी अतिशय शिताफीने दोन पिकअप व आयशर टेम्पो अडवून तपासणी केली. त्यावेळी दोन्ही पिकअपमध्ये कत्तल केलेले गोमांस भरलेले आढळले, तर आयशर टेम्पोमध्ये चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता दाटीवाटीने क्रूरपणे बांधलेल्या १३ जर्सी गायी आढळून आल्या.

​पोलीस पथकाने तात्काळ तिन्ही वाहने आणि संशयितांना वाशी पोलीस ठाण्यात आणून एकूण २७ लाख ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधित तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​ही उल्लेखणीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस अंमलदार महेबुब अरब, सुभाष चौरे आणि प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india