तुळजापुरात शारदीय नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी! जिल्हाधिकाऱ्यांकडून दर्शन मार्ग आणि पार्किंग व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी!
भाविकांना सुलभ दर्शन अन् मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज; प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार.
तुळजापूर प्रतिनिधी:-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचा शारदीय नवरात्र महोत्सव ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात येणाऱ्या लाखो भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी तुळजापूर शहरातील विविध ठिकाणच्या तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे, वाहतूक व पार्किंग व्यवस्थेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला.
पार्किंग व वाहतूक नियोजनावर भर
जिल्हाधिकारी पुजार यांनी शहरातील घाटशिळ पार्किंग, हडको मैदान पार्किंग, अग्निशामक पार्किंग यासह धाराशिव रोड, लातूर रोड आणि नळदुर्ग रोड येथील पार्किंग व्यवस्थेची पाहणी केली. या ठिकाणी उपलब्ध जागा, वाहनांची क्षमता, प्रवेश व निर्गमन मार्ग आणि भाविकांच्या वाहनांसाठीच्या सुविधांची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.
उत्सवाच्या काळात खासगी वाहने आणि एसटी बसेसची मोठी गर्दी होणार असल्याने शहरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच वाहनचालकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
बिडकर पायऱ्या मार्ग व मंदिर परिसराचा आढावा
जिल्हाधिकाऱ्यांनी बिडकर पायऱ्या मार्गे असलेल्या दर्शन रांगेची पाहणी करून श्री तुळजाभवानी मंदिर आणि मंदिर परिसरातील विविध व्यवस्थांची तपासणी केली. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची
गर्दी लक्षात घेऊन:
प्रवेश व निर्गमन मार्ग सुरळीत ठेवणे
कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करणे
पिण्याचे पाणी, स्वच्छता व आरोग्य सुविधा सज्ज ठेवणे
विविध विभागांमध्ये समन्वय राखून दर्शन व्यवस्था अडथळामुक्त ठेवणे
या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक
पाहणीनंतर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. यामध्ये सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, वीज व्यवस्था, अग्निशमन आणि भाविकांच्या मूलभूत सोयी-सुविधांबाबत करण्यात आलेल्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वाढती गर्दी लक्षात घेता सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने व काटेकोरपणे आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
या पाहणी व आढावा बैठकीस पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक चोरमले, आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद साठे, सा. बां. उपअभियंता विजय आवळे, महावितरणचे अभियंता नंदकुमार काळे यांच्यासह मंदिर संस्थान व विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.








