धाराशिवमध्ये पिकांचे १००% बाधित क्षेत्र म्हणून नोंद करून तातडीने पंचनामे करा; आमदार कैलास पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!
सोयाबीन, मूग, उसासह फळबागा आणि भाजीपाल्याचे अतोनात नुकसान; वस्तुनिष्ठ पाहणी करून शासनाला अहवाल सादर करण्याचे पत्राद्वारे आवाहन.
तुळजापूर प्रतिनिधी:-
जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन, मूग, ऊस, फळबागा, फुलशेती आणि भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने या सर्व पिकांची ‘१०० टक्के बाधित क्षेत्र’ म्हणून नोंद करावी आणि तातडीने पंचनामे सुरू करावेत, अशी जोरदार मागणी आमदार कैलास पाटील यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना थेट पत्र सादर केले आहे.
पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे उभी पिके करपली
चालू खरीप हंगामात पावसाने मोठा खंड दिल्यामुळे आणि निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील उभी पिके पूर्णपणे करपून गेली आहेत. जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनसह इतर सर्व पिकांची उत्पादकता यंदा जवळपास नष्ट झाली असून, शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
पंचनाम्यांतील त्रुटींमुळे शेतकरी मदतीपासून वंचित
शासकीय यंत्रणेकडून करण्यात येणाऱ्या पंचनाम्यांमध्ये अनेकदा मोठा गोलमाल किंवा निष्काळजीपणा दिसून येतो. प्रत्यक्ष शेतात १०० टक्के नुकसान झालेले असतानाही सरकारी दप्तरी कमी बाधित क्षेत्राची नोंद केली जाते. परिणामी, प्रत्यक्ष नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि इतर शासकीय मदतीचा अपेक्षित लाभ मिळत नाही, अशी तक्रार आ. पाटील यांनी पत्रात नमूद केली आहे.
आमदार कैलास पाटील यांच्या मुख्य मागण्या-
वस्तुनिष्ठ व पारदर्शक पाहणी- महसूल आणि कृषी विभागाने प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची खरी परिस्थिती पाहावी आणि पारदर्शक पाहणी करावी.
१००% बाधित नोंद: पूर्ण नुकसान झालेल्या क्षेत्राची कोणत्याही अटींशिवाय १०० टक्के बाधित क्षेत्र म्हणून नोंद करण्यात यावी.
तात्काळ अहवाल- पाहणीचा सविस्तर अहवाल त्वरित तयार करून राज्य शासनाकडे मंजुरी व मदतीसाठी पाठवण्यात यावा.
.यंत्रणेला त्वरित आदेश- जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल, कृषी आणि संबंधित यंत्रणांना विलंब न लावता पंचनाम्यांचे काम सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश द्यावेत.






