तेरखेडा हायवेवर स्कुटीला उडवून पळालेला टेम्पोचालक निष्पन्न; ढोकी येथून स्थानिक गुन्हे शाखेकडून थेट बेड्या!
तुळजापूर प्रतिनिधी:-
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर (एनएच ५२) तेरखेडा शिवारात वनविभागाच्या जागेसमोर स्कुटीला समोरासमोर धडक देऊन १९ वर्षीय तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या आणि अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पोचालकाचा स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव व येरमाळा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन त्याला तात्काळ ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुम येथील लक्ष्मीनगर निवासी यशराज श्रीकृष्ण चव्हाण (वय १९ वर्ष) हे २९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २:४५ वाजता आपल्या स्कुटीने (क्र. MH 25 BH 5581) जात होते. दरम्यान, तेरखेडा येथे अज्ञात वाहनचालकाने आपले वाहन हलगर्जीपणाने व अतिवेगाने चालवून यशराज यांच्या स्कुटीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्याने यशराज चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर संबंधित चालक जखमीस उपचारासाठी रुग्णालयात न नेता घटनास्थळावरून वाहन घेऊन पसार झाला होता.
याप्रकरणी मृत तरुणाचे वडील श्रीकृष्ण रामलिंग चव्हाण (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३० सप्टेंबर रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद (गु.र.नं. ३४१/२०२६) भा.न्या.सं. कलम २८१, १०६(१) सह १३४(अ)(ब), १८४ मोटार वाहन कायद्यान्वये नोंदवण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून येरमाळा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्र वेगाने फिरवली. तपासादरम्यान सदर वाहनाची माहिती राजेशनगर (ढोकी) येथील असल्याची निष्पन्न झाली. एलसीबीच्या पथकाने तात्काळ सापळा रचून आरोपी शुभम अच्युत काळे (वय २२ वर्ष, रा. राजेशनगर, ढोकी, ता. जि. धाराशिव) याला अशोक लेलँड टेम्पोसह (क्र. MH 47 Y 3425) ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी व टेम्पो येरमाळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, सपोनि यशवंत घोडके (येरमाळा पो. ठाणे), तसेच अंमलदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, चालक पोलीस अंमलदार नागनाथ गुरव, रत्नदीप डोंगरे आणि शिवाजी घाडगे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.






