Best News Portal Development Company In India

कंटेकुर येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा; ज्येष्ठांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना मिळाली जीवनमूल्यांची प्रेरणा.

कंटेकुर येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा; ज्येष्ठांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना मिळाली जीवनमूल्यांची प्रेरणा.

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

(दि २ ) ज्येष्ठांविषयी आदर, कृतज्ञता आणि आपुलकीची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी, तसेच त्यांच्या समृद्ध अनुभवातून विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने कंटेकुर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत गुरुवारी (दि. १) रोजी ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
​कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळकरी मुलांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचे स्वागत करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ व शुभेच्छा देत ज्येष्ठांविषयीचा आदर व्यक्त केला.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची अधिकृत सुरुवात झाली. मुख्याध्यापक पटणे
यावेळी मार्गदर्शन करताना शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पटणे यांनी, “ज्येष्ठ व्यक्ती हा कुटुंबाचा अनुभवसंपन्न आधारस्तंभ असतो. त्यांचे विचार, संस्कार, परंपरा आणि ज्ञान पुढील पिढीसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरतात. ज्येष्ठांचा सन्मान करणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यांना आधार देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनीही भाषणे, कविता आणि मनोगतांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमात उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या आयुष्यातील सुख-दुःखाचे व संघर्षाचे प्रसंग मांडले. कष्ट, प्रामाणिकपणा, शिस्त, वेळेचे नियोजन, व्यसनांपासून दूर राहणे आणि संस्कारक्षम जीवन जगण्याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. या संवादात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांची नियमित विचारपूस करण्याचा आणि त्यांचा सन्मान राखण्याचा सामूहिक संकल्प केला.

​या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार कलशेट्टी यांनी केले.
यशस्वीतेसाठी जीवन सूर्यवंशी, लक्ष्मण येवते, लतिफ लदाफ, चित्ररेखा दंडे, लक्ष्मीबाई शिकारे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india