धाराशिवमध्ये पाणीटंचाई टाळण्यासाठी आमदारांचे पाऊल; ग्रामीण पाणीपुरवठा विहिरींना ‘गावठाण फिडर’वरून २४ तास वीज द्या — आमदार कैलास पाटील यांची महावितरणकडे आग्रही मागणी!
तुळजापूर प्रतिनिधी:-
धाराशिव जिल्ह्यात यंदा पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे अनेक भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होऊ नये, यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी व इतर जलस्त्रोतांना ‘गावठाण फिडर’वरून जोडणी देऊन २४ तास अखंडित वीजपुरवठा करावा, अशी आग्रही मागणी आमदार कैलास पाटील यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
वीजपुरवठ्यातील खंडामुळे पाणीपुरवठा अडचणीत
ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी ग्रामपंचायतींकडून विहिरी तसेच इतर जलस्त्रोतांचा वापर केला जातो. मात्र, अनेक गावांमध्ये या जलस्त्रोतांवर स्वतंत्र डीटीसी (DTC) उपलब्ध नाही. तसेच अनेक ठिकाणी कृषी (AG) फिडरवरून वीज पुरवली जात असल्याने पाणीपुरवठा योजनांना २४ तास वीज मिळत नाही. आधीच पावसामुळे विहिरींमधील पाणीसाठा खालावला आहे; त्यातच विजेच्या लपंड्यामुळे ग्रामपंचायतींना नियमित पाणीपुरवठा करणे कठीण जात आहे.
गावठाण फिडरमुळे प्रश्न सुटण्यास मदत
जर सर्व पाणीपुरवठा विहिरींना गावठाण फिडरवरून वीज कनेक्शन दिले, तर २४ तास वीज उपलब्ध होईल. यामुळे ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजना सुरळीत चालवता येतील आणि ग्रामीण भागातील नागरिकांना नियमित व पुरेसे पिण्याचे पाणी मिळण्यास मोठी मदत होईल, असे आमदार कैलास पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.
या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन महावितरणच्या संबंधित विभागाने धाराशिव जिल्ह्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा जलस्त्रोतांना गावठाण फिडरवरून वीज जोडणी देण्याची कार्यवाही त्वरित करावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.







