Best News Portal Development Company In India

*ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या बळीराजा आधार अभियानाला सुरुवात* *डिग्गी, कसगी व जकेकूरवाडीत दुष्काळ सर्वेक्षण, श्रमदान आणि जलसंधारणाच्या कामांचा प्रारंभ*

*ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या बळीराजा आधार अभियानाला सुरुवात*

*डिग्गी, कसगी व जकेकूरवाडीत दुष्काळ सर्वेक्षण, श्रमदान आणि जलसंधारणाच्या कामांचा प्रारंभ*

*शेतमजूर महिलांना साडी चोळी व श्रमसाहित्याचे वाटप, कसगीत २५ जलतारा खड्ड्यांचा संकल्प*

उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बळीराजा आधार अभियान २०२६ २७ च्या प्रत्यक्ष कामाला शुक्रवारी डिग्गी, कसगी आणि जकेकूरवाडी येथून सुरुवात करण्यात आली. दुष्काळाची गावनिहाय वस्तुस्थिती नोंदविणे, पिकांची प्रत्यक्ष पाहणी, शेतकरी व ग्रामपंचायत प्रतिनिधींशी संवाद तसेच लोकसहभागातून जल व मृदसंधारणाची कामे सुरू करणे यावर अभियानाच्या पहिल्या टप्प्यात भर देण्यात आला.

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात फाउंडेशनने विवेकयात्रेच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तू व आर्थिक मदत संकलित करून जवळपास दोन लाख रुपयांची मदत गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचविली होती. यंदा कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आज आधार, उद्यासाठी पाणी आणि पुढच्या पेरणीसाठी बळ या भूमिकेतून उमरगा व लोहारा तालुक्यात पुढील पेरणी हंगामापर्यंत बळीराजा आधार अभियान राबविण्याचा निर्णय फाउंडेशनने घेतला आहे.

डिग्गीत शेतमजूर महिलांना आधार, श्रमदानातून कामाची सुरुवात

डिग्गी येथे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. शेतकरी तसेच सरपंच यांच्याकडून दुष्काळाची वस्तुस्थिती मांडणारे स्वतंत्र सर्वेक्षण फॉर्म भरून घेण्यात आले. त्यानंतर शेतांना भेटी देऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

यावेळी गावातील २१ गरजू शेतमजूर महिलांना साडी चोळी भेट देण्यात आली. तसेच कुदळ, फावडे आणि टोपल्या असे श्रमदानासाठी आवश्यक साहित्य देण्यात आले. पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून जलतारा प्रकल्प, नाले सफाई, नाले खोलीकरण व रुंदीकरण तसेच जल व मृदसंधारणाच्या कामांचे महत्त्व ग्रामस्थांना सांगून श्रमदानातून प्रत्यक्ष कामाची सुरुवात करण्यात आली.

डिग्गी येथे ग्रामसेवक सौ. एस. एस. वाघमोडे, सरपंच संतोष कवठे, गुरुबसय्या स्वामी, सामाजिक कार्यकर्ते युसूफ मुल्ला, कृषी सहाय्यक, तलाठी यांच्यासह शेतकरी, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

कसगीत पाच जलतारा प्रकल्पांचा प्रारंभ

कसगी येथे शेतकरी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींकडून वस्तुस्थितीदर्शक फॉर्म भरून घेऊन शेतातील पिकांची पाहणी करण्यात आली. ग्रामस्थांना कुदळ, फावडे व टोपल्यांचे वाटप करण्यात आले.

येथे श्रमदानातून पाच जलतारा प्रकल्पांच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. अभियानाच्या माध्यमातून गावात एकूण २५ जलतारा खड्डे पूर्ण करण्याचा संकल्पही करण्यात आला.

यावेळी श्री. रेवणसिद्धेश्वर शेतकरी गटाच्या सामुदायिक तथा गटशेतीच्या प्रयोगाची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने राबविलेल्या या प्रयोगाचे फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

कसगी येथे सरपंच हनमंत गुरव, माणिक सुंटनुरे, मनोज मांडवे, सोमनाथ चनपटणे, महेश गुरव यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

जकेकूरवाडीत शेतकऱ्यांशी संवाद

आदर्श गाव जकेकूरवाडी येथे अभियानाच्या तिसऱ्या सत्रात शेतकऱ्यांशी दुष्काळी परिस्थितीबाबत संवाद साधण्यात आला. शेतकरी व ग्रामपंचायत स्तरावरील वस्तुस्थितीदर्शक फॉर्म भरून घेण्यात आले तसेच ग्रामस्थांना जल व मृदसंधारणाच्या श्रमदानासाठी कुदळ, फावडे व टोपल्यांचे वाटप करण्यात आले.

गावातील शेती व पाण्याची परिस्थिती जाणून घेण्याबरोबरच जकेकूरवाडीने लोकसहभागातून राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यात आली. यावेळी सरपंच अमर सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढील पेरणीपर्यंत अभियान सुरू राहणार

बळीराजा आधार अभियान केवळ दुष्काळ सर्वेक्षण किंवा तात्पुरत्या मदतीपुरते मर्यादित राहणार नसून उमरगा आणि लोहारा तालुक्यात टप्प्याटप्प्याने त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. गावभेटींमधून पाणी, चारा, रोजगार, पीकविमा व शासकीय मदतीशी संबंधित प्रश्नांची नोंद करून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.

त्याचबरोबर जलतारा प्रकल्प, नाले सफाई, नाले खोलीकरण व रुंदीकरण, जल व मृदसंधारण आणि श्रमदानाच्या कामांना लोकसहभागातून चालना देण्याचे नियोजन आहे. अत्यंत संकटग्रस्त कुटुंबांसाठी दिलासा आणि आगामी खरीप हंगामापूर्वी गरजू शेतकऱ्यांसाठी पेरणीची शिदोरी हे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.

पहिल्या दिवसाच्या अभियानात मातोश्री शांताबाई चव्हाण, ऍड. शीतल चव्हाण, प्रा. राजू बटगिरे, व्यंकट भालेराव, वैभव मूळे, बबीता मदने, धानय्या स्वामी, किशोर बसगुंडे, सत्यनारायण जाधव, विजय चितली आदी फाउंडेशनचे पदाधिकारी व सहकारी सहभागी झाले होते.

दुष्काळाच्या प्रश्नावर केवळ चर्चा न करता गावागावातील वास्तव नोंदविणे, शेतकऱ्यांचे प्रश्न शासन प्रशासनापर्यंत पोहोचविणे आणि जे शक्य आहे ते लोकसहभागातून प्रत्यक्ष सुरू करणे ही अभियानाची भूमिका आहे. हे अभियान एका दिवसापुरते मर्यादित नसून पुढील पेरणी हंगामापर्यंत उमरगा आणि लोहारा तालुक्यात टप्प्याटप्प्याने राबविले जाईल, अशी माहिती ऍड. शीतल चव्हाण यांनी दिली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india