आई श्री तुळजाभवानी देवींच्या मंचकी निद्रेने शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ; ११ ऑक्टोबरला होणार मूळ सिंहासनावर विराजमान!
तुळजापूर प्रतिनिधी:-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज सायंकाळी अत्यंत भक्तिमय वातावरणात मंचकी निद्रेने प्रारंभ झाला. सायंकाळी पार पडलेल्या विशेष अभिषेक पूजेनंतर श्री तुळजाभवानी देवी शेजगृहातील पलंगावर मंचकी निद्रेसाठी विसावल्या.
भाद्रपद कृष्ण अष्टमीपासून अमावास्या समाप्तीपर्यंत देवीची ही मंचकी निद्रा चालणार आहे. आठ दिवसांची ही निद्रा पूर्ण झाल्यानंतर आश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच ११ ऑक्टोबर रोजी पहाटे श्री तुळजाभवानी देवी पुन्हा आपल्या मूळ सिंहासनावर विराजमान होतील. यानंतरच शारदीय नवरात्रोत्सवातील मुख्य धार्मिक विधींना सुरुवात होईल.
‘घोर निद्रे’ची धार्मिक आख्यायिका
धार्मिक परंपरेनुसार, महिषासुराच्या वाढत्या अत्याचारांपासून सृष्टीचे रक्षण करण्यासाठी श्री तुळजाभवानी देवी योगनिद्रेत राहून युद्धाची तयारी करत होत्या. महिषासुराचा उपद्रव वाढल्याने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी देवीला जागृत केले. योगनिद्रेतून जागृत झाल्यानंतर देवीने अत्यंत घोर रूप धारण करून महिषासुराचा संहार केला. त्यामुळेच देवीच्या या विशेष निद्रेला ‘घोर निद्रा’ असेही म्हटले जाते.
वर्षभरात २१ दिवसांची मंचकी निद्रा
देशभरातील शक्तीपीठांमध्ये श्री तुळजाभवानी देवीचे स्थान अनन्यसाधारण आहे. येथील देवीची मूर्ती ही ‘चलमूर्ती’ असल्याने धार्मिक परंपरेनुसार देवी वर्षातून तीन वेळा, एकूण २१ दिवस मंचकी निद्रा घेते.
शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी- ८ दिवस
सीमोल्लंघनानंतर- ५ दिवस
शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी- ८ दिवस
पारंपरिक सेवेचा उत्साह
मंचकी निद्रेच्या पूर्वसंध्येला सेवेकरी पलंगे कुटुंबीयांनी देवीचा पलंग घासून-पुसून स्वच्छ धुतला. तसेच आराधी महिलांनी मंचकी निद्रेच्या गाद्यांसाठी लागणारा कापूस पिंजून देण्याची पारंपरिक सेवा उत्स्फूर्तपणे बजावली.
या प्रसंगी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार, तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सहायक व्यवस्थापक जयसिंग पाटील व नागेश शितोळे, लेखाधिकारी संतोष भेंकी, सिद्धेश्वर इंतुले, धार्मिक व्यवस्थापक रामेश्वर वाले, अनुप ढमाले, अमोल भोसले यांच्यासह महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, महंत चिलोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, विपिन शिंदे, अनंत कोंडो आणि मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.








