भाविकांच्या आरोग्यासाठी डॉ. उदय वैद्य यांचे दातृत्व! श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला ५ स्ट्रेचर व प्रथमोपचार साहित्य सुपूर्द.
तुळजापूर प्रतिनिधी:-
आगामी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी सोलापूर येथील डॉ. उदय वैद्य यांनी सामाजिक बांधिलकी जपत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला ५ स्ट्रेचर आणि आवश्यक प्रथमोपचार साहित्य भेट दिले. देवीच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी हे साहित्य मंदिर संस्थानकडे सुपूर्द केले.
मंदिर संस्थानच्या वतीने सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील यांनी हे साहित्य स्वीकारले. डॉ. उदय वैद्य हे दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सव आणि चैत्र पौर्णिमा यात्रेच्या काळात भाविकांच्या सेवेसाठी मंदिर संस्थानला प्रथमोपचार साहित्य नियमितपणे उपलब्ध करून देतात. त्यांच्या या निरंतर सेवेचे मंदिर प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले.
या उपक्रमाबद्दल श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने सहायक व्यवस्थापक जयसिंग पाटील यांच्या हस्ते डॉ. उदय वैद्य यांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा भेट देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सहायक सुरक्षा निरीक्षक श्रीकांत पवार यांच्यासह मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
यात्रा काळात आई तुळजाभवानीच्या भाविक भक्तांना या साहित्याचा चांगलाच उपयोग होईल. अशी भावना भाविक भक्त आणि नागरिकांतून व्यक्त होत आहेत.






