Best News Portal Development Company In India

तुळजापूरमध्ये भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न: ९६६ रुग्णांची तपासणी, ८० जणांवर होणार मोफत शस्त्रक्रिया!

तुळजापूरमध्ये भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न: ९६६ रुग्णांची तपासणी, ८० जणांवर होणार मोफत शस्त्रक्रिया!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
मृणाली फाऊंडेशन तुळजापूर, शिवसेना डॉक्टर सेल महाराष्ट्र राज्य, कै. पवनराजे फाऊंडेशन धाराशिव आणि आरोग्य विभाग तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत सर्वरोग निदान, औषधोपचार व शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ९६६ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, तर पुढील उपचारांची गरज असलेल्या ८० रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले. या शिबिराला खासदार ओमराजे निंबाळकर आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ऑनलाईन
माध्यमातून उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

​याप्रसंगी व्यासपीठावर जयराजे निंबाळकर, मीनाताई सोमाजी, प्रा. शकुंतला मगर, मनीषा वाघमारे, नगरसेवक सोमनाथ गुरव, नानासाहेब घाडगे, नगरसेवक कदम, नगरसेवक आनंदा जगताप, किरण लोंढे, अक्षय परमेश्वर, रणजित इंगळे, विकास जाधव पाटील, ऋषिकेश मगर, शिवसेना डॉक्टर सेल तालुकाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, काठीचे सरपंच सुजित हंगरगेकर, शंकर कौडगिरे, डॉ. धनंजय पडवळ, नागनाथ भांजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

​८० टक्के राजकारणाऐवजी १०० टक्के समाजकारणाची वेळ: खासदार ओमराजे निंबाळकर-
ऑनलाईन संदेशाद्वारे बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले, “महत्त्वाच्या कामामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आजाराने ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णावर वेळीच उपचार करून त्याला मदत करण्यातच खरे समाधान आहे.” या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेणारे युवा नेते ऋषी मगर आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व डॉक्टर मंडळींचे त्यांनी विशेष आभार मानले.

​प्रत्येक गटात आरोग्य शिबिर घेणार- ऋषी मगर
प्रास्ताविक करताना युवा नेते ऋषी मगर म्हणाले की, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संकल्पनेतून हे शिबिर साकार झाले आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांवर आरोग्यविषयक आर्थिक बोजा पडू नये, यासाठी खासदारांच्या सूचनेनुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुट्टीचा दिवस असूनही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी दिलेले योगदान व जनतेचा प्रतिसाद कौतुकास्पद आहे. दुष्काळामुळे आता ८० टक्के समाजकारणाऐवजी १०० टक्के समाजकारण करण्याची गरज आहे. यानंतर पुढील आरोग्य शिबिर नळदुर्ग येथे होणार असून, त्यानंतर प्रत्येक गटात टप्प्याटप्प्याने शिबिर आयोजित केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

​मोफत शस्त्रक्रियेची सोय-
शिबिरात निदान झालेल्या गरजू रुग्णांच्या सर्व शस्त्रक्रिया मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल येथे ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना’ आणि ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’च्या माध्यमातून मोफत केल्या जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब काडगावकर यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि मित्रपरिवाराने विशेष परिश्रम घेतले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india