Best News Portal Development Company In India

उसाला ५,००० रुपये दर मिळेपर्यंत कारखाने सुरू करू नका! तेरणा परिसर शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; तीव्र आंदोलनाचा इशारा !

उसाला ५,००० रुपये दर मिळेपर्यंत कारखाने सुरू करू नका! तेरणा परिसर शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; तीव्र आंदोलनाचा इशारा !

​तुळजापूर प्रतिनिधी;-
ढोकी व पंचक्रोशीतील सहकारी, खाजगी गुळपावडर, गुळधुपट्टी व खांडसरी कारखान्यांनी उसाचा योग्य दर निश्चित केल्याशिवाय कारखाने सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी ठाम भूमिका ‘तेरणा परिसर शेतकरी संघर्ष समिती’ने घेतली आहे. यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व परिसरातील शेतकऱ्यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदनाद्वारे मागण्या सादर केल्या आहेत.

​शेतकरी व कारखानदार यांच्यात संयुक्त बैठक होऊन उसाचा अंतिम भाव ठरत नाही, तोपर्यंत कोणत्याही कारखान्याला गाळप परवाना व बॉयलर अग्निप्रदीपनाची परवानगी देण्यात येऊ नये आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ मध्यस्थी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
​निवेदनातील प्रमुख मागण्या:
​योग्य भाव मिळणे: उसाला पहिली उचल ४,००० रुपये द्यावी व अंतिम भाव ५,००० रुपये प्रतिटन करण्यात यावा.

​बिल अदा करणे- ऊस घातल्यानंतर १५ व्या दिवशी उसाचे बिल थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.
​वजन काटा व कपात- बाहेर वजन केलेली उसाची गाडी कारखान्यामध्ये वजन करून खाली करून घ्यावी. तसेच, उसाच्या वजनामधून परस्पर २% कपात केली जाते, ती त्वरित थांबवण्यात यावी.
​FRP बाबत स्पष्टता: एफआरपी (FRP) मध्ये वाढ करण्यात यावी व त्याबाबत स्पष्टता द्यावी. तसेच एफआरपी मधील वाढीव हप्त्यांची थकबाकी लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्यात यावी.

​आंदोलनाचा इशारा-
​निवेदनात नमूद केलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि एकही कारखाना चालू होऊ दिला जाणार नाही, असा इशारा ढोकी व परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.

​या निवेदनावर तेरणा परिसर शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. अजित जगन्नाथ देशमुख, उपाध्यक्ष श्री. अमोल भारत लोमटे, श्री. गणेश संभाजी काळे, श्री. गणेश रामभाऊ पवार, श्री. उमेश विष्णु डोके यांच्यासह ढोकी परिसरातील सर्व शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail