Best News Portal Development Company In India

धाराशिव बसस्थानकावर पार्किंग ठेकेदाराची मनमानी अन् NCMC कार्डच्या नावाखाली लूट; ठेका रद्द न केल्यास रिपब्लिकन पक्षाचा आंदोलनाचा इशारा!

धाराशिव बसस्थानकावर पार्किंग ठेकेदाराची मनमानी अन् NCMC कार्डच्या नावाखाली लूट; ठेका रद्द न केल्यास रिपब्लिकन पक्षाचा आंदोलनाचा इशारा!

तुळजापूर प्रतिनिधी;-
धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकातील पार्किंग ठेकेदाराकडून प्रवाशांची मनमानी दर आकारून आर्थिक लूट केली जात असून, पार्किंगच्या जागेवर अनधिकृतपणे NCMC कार्डच्या नावाखाली नागरिकांकडून ३०० ते ४०० रुपयांची बेकायदेशीर वसुली केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित ठेकेदाराची उच्चस्तरीय चौकशी करून त्याचा ठेका तात्काळ रद्द करावा; अन्यथा १५ दिवसांत एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

याप्रकरणी पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) विभाग नियंत्रकांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनातील मुख्य मुद्दे व गंभीर आरोप:
जादा दराने पार्किंग वसुली: धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकातील पार्किंगचा ठेका घेतलेल्या सूरज माळी या ठेकेदाराकडून महामंडळाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम वसूल केली जात आहे. तसेच ठरवून दिलेल्या जागेपेक्षा अधिक जागेचा बेकायदेशीर वापर करून मनमानी पद्धतीने वसुली सुरू आहे.

NCMC कार्डच्या नावाखाली बेकायदेशीर व्यवसाय: पार्किंगच्या जागेवर परवाना नसताना सर्रास NCMC कार्ड काढण्याचा व्यवसाय सुरू आहे. ॲक्टिव्हेशन आणि बॅलन्सच्या नावाखाली प्रवाशांकडून तब्बल ३०० ते ४०० रुपये उकळले जात आहेत.

संशयास्पद प्रशासकीय मेहेरबानी: यापूर्वी सदर मशिन/आयडी ब्लॉक करून कारवाई करण्यात आली होती. तरीही पुन्हा दुसऱ्या नावाने किंवा आयडीने तेच काम सुरू झाल्याने यात अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात संगनमत किंवा प्रशासकीय दुर्लक्ष असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पैसे परत मिळवून देण्याची व गुन्हे दाखल करण्याची मागणी: ठेकेदाराकडून प्रवाशांची झालेली अनधिकृत वसुलीची रक्कम परत मिळवून द्यावी, ठेका रद्द करून नवीन निविदा काढावी आणि दोषींवर नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात यावी.

प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टीमेटम:
या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून ठेका रद्द करण्यात यावा आणि त्याचा लेखी अहवाल देण्यात यावा. येत्या १५ दिवसांच्या आत योग्य कारवाई न झाल्यास एस.टी. महामंडळाच्या धाराशिव विभागीय कार्यालयावर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर आरपीआय (खरात) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, विजयकुमार खलसे, सुनील वाघमारे,यांच्यासह पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india