Best News Portal Development Company In India

*श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची विद्यापीठ मैदानी स्पर्धेत जनरल चॅम्पियनशिपवर मोहोर*

*श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची विद्यापीठ मैदानी स्पर्धेत जनरल चॅम्पियनशिपवर मोहोर*
[सानिया शेख, हर्षदा चाकुरे आणि अंबादास राठोड यांचे वैयक्तिक प्रकारात सुवर्ण यश; रिले संघांचीही उल्लेखनीय कामगिरी]

उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने धाराशिव येथे आयोजित आंतर महाविद्यालयीन जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत जनरल चॅम्पियनशिपचा मान पटकावला. विविध मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानाची पुन्हा एकदा प्रचिती दिली. महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी हे या संघाचे मार्गदर्शक प्रमुख होते.

या स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या प्रकारात सानिया शेख हिने प्रथम क्रमांक, तर ५००० मीटर धावण्याच्या प्रकारात हर्षदा चाकुरे हिने प्रथम क्रमांक तर अंबादास राठोड यांनी दहा हजार मीटर धावणे प्रकारात वैयक्तिक प्रथम पटकावून सुवर्ण कामगिरी केली. ४ × १०० मीटर रिले मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक, तर ४ × ४०० मीटर रिले मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.
तसेच ४ × ४०० मीटर रिले मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक, तर ४ × १०० मीटर रिले मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. १५०० मीटर धावण्याच्या मुलांच्या प्रकारात तृतीय क्रमांक मिळविण्यात आला. याशिवाय १०,००० मीटर धावण्याच्या मुलींच्या प्रकारात महाविद्यालयाच्या खेळाडूने पात्रता (Qualified) मिळवली.
*महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा*
वैयक्तिक प्रकारातील सुवर्ण कामगिरी, रिले प्रकारातील दमदार प्रदर्शन आणि विविध क्रीडा प्रकारांतील सातत्यपूर्ण यशाच्या जोरावर श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयांच्या संघाने स्पर्धेची जनरल चॅम्पियनशिप पटकावली. त्यामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेत आणखी एका मानाच्या कामगिरीची भर पडली आहे.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी विजेत्या खेळाडूंचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की खेळाडूंची मेहनत, शिस्त, जिद्द आणि सांघिक भावना ही या यशामागची खरी ताकद आहे.
या यशामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात निश्चितच भर पडली असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.
भविष्यातही आपल्या खेळाडूंनी विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी महाविद्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर, डॉ. पद्माकर पिटले, प्रा. जी. एस. मोरे, प्रा. शैलेश महामुनी, क्रीडा शिक्षक प्रा. गोविंद गायकवाड आणि प्रा. बालाजी सुरवसे तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि क्रीडा विभागाच्या वतीने सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india