उमरगा-लोहारा तालुक्यात तातडीने ‘चारा छावण्या’ सुरू करा: आमदार प्रविण स्वामी यांची मंत्रालयात मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे मागणी.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघात पावसाचा अभाव आणि भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकरी व पशुपालक मोठ्या संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार प्रविण विरभद्रय्या स्वामी यांनी मुंबई येथे मंत्रालयात राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री मा. ना. पंकजाताई मुंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तालुक्यातील पशुधनाच्या संरक्षणासाठी तातडीने ‘चारा छावण्या’ सुरू करण्याबाबतचे निवेदन सादर केले.
सादर केलेल्या निवेदनात मतदारसंघात चारा व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाचे संगोपन करणे कठीण झाले आहे. शासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे.
दुष्काळग्रस्त भागातील गावांमध्ये शासकीय स्तरावर चारा व पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करावी.
गरज असलेल्या ठिकाणी त्वरित शासकीय ‘चारा छावण्या’ सुरू करण्याचा निर्णय घ्यावा.
पशुधनासाठी मोफत पशुवैद्यकीय तपासणी, औषधोपचार व लसीकरणाची विशेष मोहीम राबवावी.
पशुपालकांना शासनाच्या विविध योजनांतून थेट आर्थिक मदत व पशुधनविषयक सहाय्य उपलब्ध करून द्यावे.
दुष्काळी परिस्थितीमुळे होणारे पशुधनाचे स्थलांतर व विक्री थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत.
या प्रसंगी पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी निवेदनाचा सकारात्मक विचार करून प्रशासनाला आवश्यक ती पाहणी करून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन दिले आहे. “उमरगा-लोहारा तालुक्यातील बळीराजा आणि पशुधन वाचवण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी पाठपुरावा केला जाईल,” असा विश्वास आमदार प्रविण स्वामी यांनी व्यक्त केला आहे.







