Best News Portal Development Company In India

उमरगा-लोहारा मतदारसंघातील भूकंपग्रस्त गावांच्या नागरी सुविधांसाठी विशेष निधी मंजूर करा!

उमरगा-लोहारा मतदारसंघातील भूकंपग्रस्त गावांच्या नागरी सुविधांसाठी विशेष निधी मंजूर करा
आमदार प्रविण स्वामी यांची मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

उमरगा व लोहारा विधानसभा मतदारसंघातील पुनर्वसित आणि बाधित भूकंपग्रस्त गावांमध्ये पायाभूत व नागरी सुविधांचा मोठा अनुशेष निर्माण झाला असून, हा अनुशेष तातडीने दूर करण्यासाठी विशेष बाब म्हणून निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रविण वीरभद्रय्या स्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार प्रविण स्वामी यांनी पत्रात नमूद केले आहे की, १९९३ च्या विनाशकारी भूकंपानंतर मतदारसंघातील उमरगा तालुक्यातील ८२ आणि लोहारा तालुक्यातील ४२ अशा एकूण १२४ ग्रामपंचायतींमधील तांडे, वाड्या व वस्त्यांसह १५४ गावांचा यामध्ये समावेश होतो. शासनाने ‘अ’ वर्गवारीतील २६ आणि ‘ब’ वर्गवारीतील १२ गावांचे पुनर्वसन केले होते, तर ‘क’ वर्गवारीतील बाधित घरांच्या दुरुस्तीसाठी अनुदान दिले होते.

मात्र, पुनर्वसनाच्या कालावधीत झालेली अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम व विद्युतीकरणाची कामे ही पक्या स्वरूपाची झालेली नाहीत. अनेक गावांमध्ये अद्याप स्मशानभूमी बांधकाम, अंगणवाडी यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत.

तसेच शाळा व इतर सार्वजनिक इमारतींना २५ वर्षांहून अधिक कालावधी झाल्यामुळे त्या अत्यंत जीर्णावस्थेत आल्या आहेत.
तसेच ‘क’ वर्गवारीतील बाधित नागरिकांनी विस्तारित वस्त्यांमध्ये घरे उभारली असून, त्या भागांत रस्ते, नाली, वीज व पाणी या मूलभूत सुविधांचा प्रचंड तुटवडा आहे. पावसाळ्यात पक्के रस्ते नसल्यामुळे नागरिक, महिला व विद्यार्थ्यांचे दळणवळणात अतोनात हाल होत आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर, महसूल व वन विभागाच्या शासन शुद्धीपत्रकातील तरतुदींनुसार उमरगा-लोहारा मतदारसंघातील भूकंपग्रस्त सर्व गावांमध्ये अंतर्गत रस्ते, नाली बांधकाम व इतर नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष निधी मंजूर करावा, अशी विनंती आमदार प्रविण स्वामी यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india