*आर्थिक साक्षरतेसोबत आर्थिक शिस्तही आत्मसात करावी : डॉ. संजय अस्वले*
उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी व शैक्षणिक ज्ञान मिळविणे पुरेसे नाही, तर दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहारांचे ज्ञान आत्मसात करण्याबरोबरच आर्थिक शिस्तही अंगीकारणे आवश्यक आहे. पैसा कमावणे, त्याचे योग्य नियोजन, बचत, गुंतवणूक आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार याबाबत विद्यार्थ्यांनी लहान वयातच जागरूक झाले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले. ते काल गुरुवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा’ अंतर्गत फायनान्स क्लबच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
फायनान्स क्लबच्या अध्यक्षपदी खान मसरूद्दीन, तर सदस्य म्हणून शिंदे प्रतीक्षा, सास्तुरे करीना, गायकवाड अर्चना आणि शेख जावेद यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्याच्या उद्देशाने या क्लबच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
डॉ. अस्वले पुढे म्हणाले, डिजिटल व्यवहार वाढत असताना सायबर फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ओटीपी, यूपीआय पिन, एटीएम पिन, संकेतशब्द यांसारखी गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये. आकर्षक ऑफर किंवा झटपट नफ्याच्या आमिषाला बळी न पडता योग्य माहिती घेऊन आर्थिक निर्णय घेण्याची सवय विद्यार्थ्यांनी विकसित करावी. फायनान्स क्लब हा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल.
फायनान्स क्लबच्या माध्यमातून राष्ट्रीय वित्तीय शिक्षण केंद्राचे वित्तीय साक्षरता प्रमाणपत्र, वित्तीय प्रश्नमंजुषा, ‘गरज की इच्छा?’ पोस्टर स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या खर्चाच्या सवयींचे सर्वेक्षण, यूपीआय व एटीएम सुरक्षा प्रात्यक्षिक, सायबर फसवणुकीविरोधी पथनाट्य, बँक व पोस्ट कार्यालय भेट, नमुना एसआयपी गुंतवणूक प्रात्यक्षिक, विमा व आर्थिक फसवणूक विषयक तज्ज्ञ मार्गदर्शन तसेच ‘३० दिवसांत १,००० रुपयांची बचत’ यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना बचत, अर्थसंकल्प, बँकिंग, डिजिटल पेमेंट, गुंतवणूक, एसआयपी, विमा, आर्थिक जोखीम आणि सायबर फसवणूक याबाबत कृतीआधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उमरगा तालुका करिअर कट्टा समन्वयक डॉ. समाधान पसरकल्ले, महाविद्यालयीन समन्वयक डॉ. चंद्रसेन करे आणि डॉ. अर्जुन कटके यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, करिअर संसदेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करियर संसद मुख्यमंत्री पूजा हांडे यांनी केले तर आभार प्रतीक्षा शिंदे यांनी मानले.







