आळणीत जुन्या वादातून तरुणावर चाकू, लोखंडी रॉडने हल्ला व जातीवाचक शिवीगाळ; चौघांवर अॅट्रॉसिटीसह गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी:-
जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला अडवून जातीवाचक शिवीगाळ करत चाकू व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना धाराशिव तालुक्यातील आळणी येथे घडली आहे. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गंभीर दुखापत करणे आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आळणी येथील रहिवासी लखन मधु कांबळे (वय २५) हे दि. ०५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २:०० ते २:३० वाजेच्या सुमारास गावातील तलाठी कार्यालयासमोरील रस्त्यावरून जात होते. यावेळी संशयित आरोपी वैभव कदम, अजित वीर (दोघे रा. आळणी, ता. जि. धाराशिव) आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर दोन इसमांनी मागील भांडणाची कुरापत काढून लखन यांना गाठले.
आरोपींनी लखन कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी लखन यांना लाथाबुक्क्यांनी, चाकूने व लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले.
उपचारदरम्यान जखमी लखन कांबळे यांनी दि. ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून धाराशिव ग्रामीण पोलिसांनी आरोपी वैभव कदम, अजित वीर व इतर दोन अज्ञात इसमांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १२६(२), ३(५) सह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(व्हीए) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करत आहेत.






