Best News Portal Development Company In India

सण-उत्सव, दुष्काळ आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा असताना वीजकपात का? : आमदार कैलास पाटील.

सण-उत्सव, दुष्काळ आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा असताना वीजकपात का? : आमदार कैलास पाटील.

​महावितरणच्या कारभारावर उठवले प्रश्न; धाराशिव जिल्ह्यात अखंडित वीजपुरवठा करण्याची मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
​
तुळजापूर प्रतिनिधी:-
राज्यात कुठेही भारनियमन (लोडशेडिंग) सुरू नसल्याचा दावा शासनाकडून केला जात असताना, धाराशिव जिल्ह्यात मात्र ‘अंडर फ्रिक्वेन्सी’ आणि ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’च्या नावाखाली वारंवार वीजकपात केली जात आहे. ऐन दुष्काळात, सण-उत्सवाच्या काळात आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर असताना सुरू असलेली ही वीजकपात तातडीने थांबवून संपूर्ण जिल्ह्यात अखंडित वीजपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

​शासनाच्या दाव्यावर आणि धोरणावर प्रश्नचिन्ह
​आमदार कैलास पाटील यांनी पत्रात नमूद केले की, १९ सप्टेंबर रोजी नांदेड येथे पीक परिस्थितीच्या आढावा बैठकीत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात कुठेही लोडशेडिंग नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर काही दिवस वीजपुरवठा सुरळीत राहिला, मात्र आता पुन्हा ‘अंडर फ्रिक्वेन्सी’ आणि ‘इमर्जन्सी लोडशेडिंग’चे गोंडस नाव देऊन वीज गायब केली जात आहे.
​सध्या बैलपोळा, गणेशोत्सव आणि गौराईनंतर नवरात्रोत्सव तोंडावर आहे. ऐन हिंदू सण-उत्सवांच्या काळातच अशी वीजकपात केली जात असल्याने “हेच का तुमचे हिंदुत्ववादी सरकार?” असा थेट टोलाही आमदार पाटील यांनी सरकारला लगावला आहे.

​वीजकपातीमुळे नागरिकांना बसणारा फटका-
​दुष्काळ आणि पाणीटंचाई- जिल्ह्यात तीव्र दुष्काळामुळे भूजल पातळी खालावली आहे. विहिरी आणि कूपनलिकांमध्ये उपलब्ध असलेले पाणी उपसण्यासाठी वीज अत्यावश्यक असताना वारंवार वीज जात असल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे.

​विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान- ऑक्टोबर महिन्यातील वाढत्या उष्णतेसोबतच विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्र परीक्षा जवळ आल्या आहेत. रात्रीच्या वेळी होणाऱ्या वीजकपातीमुळे विद्यार्थ्यांना अंधारात अभ्यास करावा लागत असून त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

​कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न- रात्रीच्या वेळी गावांमध्ये वीज नसल्याचा फायदा घेऊन चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांचे विद्युत पंप, केबल आणि शेती साहित्य चोरीला जात असल्याने दुष्काळात शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडला आहे.

​तातडीने आदेश देण्याची मागणी-
धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षितता, पाणीटंचाई, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि सण-उत्सव लक्षात घेता, ‘अंडर फ्रिक्वेन्सी’च्या नावाखाली केली जाणारी वीजकपात तात्काळ थांबवण्यात यावी. महावितरणच्या अधिकाऱ्यांना धाराशिव जिल्ह्यात सुरळीत व अखंडित वीजपुरवठा देण्याबाबत स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail