Best News Portal Development Company In India

तुळजापुरात अवैध दारूविक्रीचा आरोप; महिलांच्या बेमुदत उपोषणाचा इशारा!

तुळजापुरात अवैध दारूविक्रीचा आरोप; महिलांच्या बेमुदत उपोषणाचा इशारा!

नियमबाह्य मद्यविक्री बंद करण्याची भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची मागणी; राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन

तुळजापूर, प्रतिनिधी : तुळजापूर तालुका व शहरामध्ये अवैध व नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या दारूविक्रीवर कारवाई करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, तुळजापूर येथे निवेदन देण्यात आले आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या या निवेदनात अवैध दारूविक्री, अल्पवयीन मुलांना मद्यविक्री आणि परवानाधारक विक्रेत्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

निवेदनानुसार, तुळजापूर तालुका व शहरात अवैध दारूविक्री होत असून, १८ वर्षांखालील मुलांना ओळखपत्र अथवा वयाचा पुरावा न तपासता दारू विक्री केली जात असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच प्रशासनाकडून विक्रीचे नियम पाळले जात नसल्याचे आणि काही ठिकाणी परवानाधारकांकडून नियमबाह्य पद्धतीने दारूविक्री सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावाही समितीने केला आहे.

या संदर्भात संबंधित विभागाकडे वारंवार मागण्या करूनही अवैध दारूविक्रीवर ठोस कारवाई होत नसल्याबद्दल समितीने नाराजी व्यक्त केली आहे. नियमबाह्य दारूविक्री तातडीने बंद करावी, तसेच दोषी अधिकारी आणि परवानाधारक दारूविक्रेत्यांची चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने संबंधित अधिकारी आणि दारूविक्रेते यांच्यात आर्थिक हितसंबंध आहेत का, असा प्रश्नही समितीने उपस्थित केला आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, संबंधित दारूविक्रेत्यांवर तसेच त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. अवैध दारूविक्रीबाबतच्या तक्रारींची योग्य ती चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि शासनाच्या महसुलाचे नुकसान रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी समितीने केली आहे.

या मागण्यांची दखल घेऊन कारवाई न झाल्यास अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, तुळजापूर येथे महिलांचे बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भारतीय जिल्हाध्यक्ष गणेश प्रभाकर पाटील यांनी दिला आहे. या आंदोलनाची सर्व जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभाग व संबंधित प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, धाराशिव, पोलीस अधीक्षक, धाराशिव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, धाराशिव आणि पोलीस निरीक्षक, तुळजापूर पोलीस ठाणे यांना माहितीसाठी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या निवेदनाची प्रशासनाकडून दखल घेऊन अवैध व नियमबाह्य दारूविक्रीबाबत कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india