मोबाईल शॉपी फोडणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून गजाआड; १.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त!
मुरुम येथील घरफोडीच्या २ गुन्ह्यांचा उलगडा; सोलापूरमधून दोन आरोपींना बेड्या
तुळजापूर प्रतिनिधी:-
मुरुम येथील मोबाईल शॉपी फोडून चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यशस्वी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सोलापूर येथून दोन सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ६ अँड्रॉइड मोबाईल आणि रोख रक्कमेसह एकूण १,४४,५८२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सोलापूर येथून आरोपींना ठोकल्या बेड्या
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गस्त घालत असताना, मुरुम पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यांतील आरोपी सोलापूर येथे असल्याची माहिती तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून साहिल सलीम जमादार (वय १९ वर्षे) आणि आकाश चंद्रकांत वाघमारे (वय २५ वर्षे, दोघे रा. साठे पाटील वस्ती, जुना देवगाव नाका, सोलापूर) यांना ताब्यात घेतले.
२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस-
आरोपींकडे अधिक चौकशी केली असता मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोबाईल शॉपी फोडल्याचे दोन गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून चोरीस गेलेले ६ अँड्रॉइड मोबाईल, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेला मोबाईल असा एकूण १,४४,५८२ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या गुन्ह्यात आणखी एका आरोपीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपींवर मुरुम पोलीस ठाण्यात गु.र.नं. २०८/२०२६ (कलम ३३४(१), ३०५ BNS) आणि गु.र.नं. १९१/२०२६ (कलम ३३१(४), ३०५(अ), ६२ BNS) अन्वये गुन्हे दाखल आहेत. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना मुरुम पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या पथकाने केली कारवाई-
पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली.
पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार
सपोनि सुदर्शन कासार
पोह/ शौकत पठाण
पोह/ प्रकाश औताडे
पोह/ जावेद काझी
पोह/ फरहान पठाण
चापोह/ रत्नदीप डोंगरे
यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. 





