Best News Portal Development Company In India

माझ्यावर किंवा पीएवर आरोप करण्याआधी वास्तव तपासून पहावे: आमदार राणाजगजितसिंह पाटील!

माझ्यावर किंवा पीएवर आरोप करण्याआधी वास्तव तपासून पहावे: आमदार राणाजगजितसिंह पाटील!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
“सध्या जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि हाताला काम उपलब्ध करून देणे यालाच आपले सर्वाधिक प्राधान्य आहे. माझ्याबद्दल किंवा माझ्या पीएच्या नावाने काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. अशा विषयांमध्ये माझे नाव थेट हायलाइट करण्याआधी माझ्याशी संपर्क साधून किमान विचारणा करून वस्तुस्थिती जाणून घेणे अत्यावश्यक होते,” अशा कडक शब्दांत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.

​तुळजाभवानी मंदिर प्रकरणाची पारदर्शक चौकशी होणार-
​श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात घडलेल्या प्रकाराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “सर्वोच्च न्यायालयात पीक विमा प्रकरणाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीसाठी मी दिल्लीत होतो. या कालावधीत मंदिरात जे काही घडले असेल, त्याची पारदर्शक चौकशी केली जाईल आणि दोषींवर योग्य ती कारवाई नक्कीच होईल. सर्व व्हिडिओ फुटेज उपलब्ध असून त्यात लपवण्यासारखे काहीही नाही.”

​दुष्काळ निवारण आणि पीक विम्यावर विशेष भर
​जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना आमदार पाटील म्हणाले की, २०२० च्या पीक विमा संदर्भात आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात १६ सुनावण्या पार पडल्या आहेत. शेतकऱ्यांना योग्य तो दिलासा मिळावा यासाठी आपण स्वतः प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहून सकारात्मक प्रयत्न करत आहोत.

​तसेच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यासाठी मोठा निधी आणून अशक्यप्राय वाटणारी अनेक विकासकामे पूर्ण केली जात आहेत.

​छोट्या विषयांचे भांडवल करणाऱ्यांना उत्तर
​काही लोक छोट्या विषयांचे जाणीवपूर्वक मोठे भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माध्यमांना आवाहन केले की, जिल्ह्याच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या सकारात्मक प्रयत्नांना माध्यमांनीही योग्य ते सहकार्य करावे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india