एन.व्ही.पी. शुगर कारखान्याची मोठीघडामोड; ४ कोटी ६० लाखांचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा!
तुळजापूर प्रतिनिधी:-
एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि., जागजी कारखान्याने चालू तृतीय गळीत हंगाम २०२६-२७ मधील दुसऱ्या पंधरवाड्याचे ४ कोटी ६० लाख रुपयांचे ऊस बिल थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहे. कारखान्याकडे १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत गाळपासाठी आलेल्या १५ हजार मेट्रिक टन ऊसापोटी प्रतिटन ३,१०० रुपये दराने ही रक्कम अदा करण्यात आली आहे.
वेळेत बिल अदा करण्याची परंपरा कायम
शेतकऱ्यांचे हित नेहमीच सर्वोच्चस्थानी ठेवत कारखान्याने चाचणी गळीत हंगामापासूनच अवघ्या पंधरा दिवसांत ऊसाचे बिल अदा करण्याची उत्कृष्ट परंपरा सुरू केली आहे. चालू गळीत हंगामातही ही परंपरा यशस्वीपणे कायम राखण्यात आली असून, वेळेत मिळणाऱ्या या रकमेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेती आणि घरगुती आर्थिक नियोजनासाठी मोठी मदत होत आहे.
चेअरमन नानासाहेब पाटील यांचे महत्त्वपूर्ण आवाहन-
दरम्यान, ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या बँक खात्याशी संबंधित कागदपत्रे कारखान्याकडे जमा केलेली नाहीत, त्यांनी लवकरात लवकर पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., धाराशिव येथील बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत कारखाना साइटवर जमा करावी, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन नानासाहेब ऊर्फ बालाजी पाटील यांनी केले आहे.
कारखान्याच्या या वेळेवर आणि पारदर्शक कारभारामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.







