मराठवाडा पदवीधर निवडणूक: “गेल्या १८ वर्षांचा हिशोब द्या!”; महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विरोधकांवर घणाघाती हल्ला!
तुळजापूर प्रतिनिधी:-
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवाराने पत्रकारांशी संवाद साधताना सत्ताधारी महायुतीवर आणि विद्यमान लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली.
महायुतीविरोधात पदवीधरांमध्ये प्रचंड असंतोष
पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीच्या उमेदवाराने सांगितले की, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, धाराशिवसह सर्वच जिल्ह्यांत महायुती सरकारविरुद्ध तरुणांमध्ये आणि पदवीधरांमध्ये प्रचंड रोष आहे. गेल्या १८ वर्षांत पदवीधरांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत एकही शब्द न बोलणाऱ्यांनी आधी आपल्या कामाचा आणि १८ वर्षांचा हिशोब द्यावा, अशी मागणी थेट मतदार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रोजगार निर्मिती आणि ६ वर्षांचा ‘रोडमॅप’ तयार
पदवीधरांच्या रोजगाराच्या प्रश्नावर भाष्य करताना ते म्हणाले की, “आज शेतकरी कष्ट करून मुलांना शिकवतात, पण पदवी हातात येऊनही तरुणांच्या हाताला काम नाही. शासकीय नोकऱ्या कमी होत असल्याने खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी मी मराठवाड्यातील ८ जिल्हे आणि ७६ तालुक्यांचा सखोल अभ्यास करून पुढील ६ वर्षांचा विशेष ‘रोडमॅप’ तयार केला आहे.”
महिन्याच्या ७ तारखेला थेट जनतेच्या दरबारात
विजयी झाल्यानंतर पदवीधर, महिला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दर महिन्याच्या १ ते ७ तारखेला वेगवेगळ्या जिल्ह्यांत उपस्थित राहणार असून, दर महिन्याच्या ७ तारखेला धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात (कलेक्टोरेट ऑफिस) स्वतः बसून पदवीधरांच्या समस्या सोडवणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
”२७ तारखेला महाराष्ट्रात क्रांती घडणार”
महाविकास आघाडी एकसंध असून २३ तारखेला होणाऱ्या मतदानात ‘अदृश्य शक्ती’ आणि पदवीधरांचा पाठिंबा महाविकास आघाडीलाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २७ तारखेला लागणाऱ्या निकालातून संपूर्ण महाराष्ट्रात एक मोठा राजकीय बदल आणि क्रांती पाहायला मिळेल, असा दावाही त्यांनी या वेळी केला.







