Best News Portal Development Company In India

*उमरग्यात २० ऑक्टोबर रोजी ‘विवेकयात्रा’; दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांसाठी मदतीचे संकलन!*

*उमरग्यात २० ऑक्टोबर रोजी ‘विवेकयात्रा’; दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांसाठी मदतीचे संकलन!*

*वाचन संस्कृती, विवेकवादी विचारांच्या प्रसारासोबतच बळीराजाला आधार देण्याचा संकल्प; ॲड. शीतल चव्हाण यांचे सहभागी होण्याचे आवाहन*

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालय, मुळज व ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी उमरगा शहरात ‘विवेकयात्रा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे.

यंदाच्या विवेकयात्रेच्या माध्यमातून वाचन संस्कृती व विवेकवादी विचारांचा प्रसार करण्याबरोबरच उमरगा व लोहारा तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांसाठी आर्थिक व वस्तुरूप मदतीचे संकलन करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. शीतल चव्हाण यांनी दिली.

गेल्या सहा वर्षांपासून विजयादशमीच्या निमित्ताने वाचनालय व फाउंडेशनच्या वतीने विवेकयात्रेचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थी, युवक, महिला व नागरिक हातात पुस्तके, लेखण्या आणि महामानवांच्या विचारांचे फलक घेऊन या यात्रेत सहभागी होतात. समाजात वाचन संस्कृती रुजविणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे तसेच सामाजिक समता, बंधुता आणि विवेकवादी विचारांचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

यंदा उमरगा व लोहारा तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विवेकयात्रेला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली आहे. ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या ‘बळीराजा आधार अभियान २०२६-२७’ अंतर्गत दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांच्या मदतीसाठी लोकसहभागातून निधी व आवश्यक वस्तूंचे संकलन करण्यात येणार आहे.

‘समाजात विवेक जागा झाला पाहिजे आणि तो विवेक संकटात सापडलेल्या माणसाच्या मदतीला धावून आला पाहिजे. अन्यथा विचारांना अर्थ उरत नाही. त्यामुळे यंदाची विवेकयात्रा ही केवळ वैचारिक प्रबोधनाची नव्हे, तर सामाजिक संवेदनशीलता आणि कृतिशीलतेची यात्रा ठरावी,’ असे ॲड. शीतल चव्हाण यांनी सांगितले.

सदर विवेकयात्रा मंगळवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत उमरगा शहरातील हुतात्मा स्मारक ते छत्रपती शिवाजी महाविद्यालय या मार्गावरून काढण्यात येणार आहे. विद्यार्थी, शिक्षक, युवक, महिला, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था-संघटना व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच दुष्काळग्रस्त बांधवांसाठी आपल्या क्षमतेनुसार आर्थिक अथवा वस्तुरूप मदत देऊन या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

‘हातात पुस्तक, डोक्यात विवेक आणि हृदयात माणुसकी’ हा संदेश घेऊन आयोजित करण्यात येणाऱ्या या विवेकयात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. शीतल चव्हाण, सत्यनारायण जाधव, राजू बटगिरे, व्यंकट ऊर्फ राजू भालेराव, ॲड. अर्चना जाधव, ॲड. ख्वाजा शेख, ज्योती माने, किशोर बसगुंडे, धानय्या स्वामी, किशोर औरादे, करिम शेख, शबाना उडचणे, मयूर कटके, प्रदीप मोरे, रागिणी शानेदिवाण यांनी केले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india