Best News Portal Development Company In India

धाराशिवमध्ये सांडपाण्यावर पिकणार जनावरांचा चारा! ​राघूचिवाडी तलावातील पाण्यावर ५० हेक्टरवर ज्वारी लागवडीचे नियोजन: आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती.

धाराशिवमध्ये सांडपाण्यावर पिकणार जनावरांचा चारा!
​राघूचिवाडी तलावातील पाण्यावर ५० हेक्टरवर ज्वारी लागवडीचे नियोजन: आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती.

​तुळजापूर प्रतिनिधी:-
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आगामी काळात उद्भवणारी संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता धाराशिव शहरातील सांडपाण्याचा पुनर्वापर करून जनावरांसाठी चारा निर्माण करण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव समोर आला आहे. शहरातून वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून, राघूचिवाडी तलावातील पाण्याचा वापर करत सुमारे ५० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी तलावातील पाणी उपशावरील बंदी उठवून आवश्यक परवानग्या देण्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

​पावसाच्या खंडामुळे चारा टंचाईचे संकट
​जिल्ह्यात यंदा पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणीसह आगामी काळात जनावरांच्या चार्‍याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याच्या साठ्याचा नियोजनबद्ध आणि योग्य वापर करण्याची मागणी स्थानिक शेतकरी बांधवांकडून केली जात होती.

​दररोज १ कोटी लिटर सांडपाणी तलावात जमा
​धाराशिव शहरातून दररोज सुमारे १ कोटी लिटर सांडपाणी भोगावती नदीद्वारे राघूचिवाडी तलावात जमा होते. यामुळे सध्या या तलावात ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने आणि त्यावर पुरेशी प्रक्रिया होत नसल्याने थेट वापरासाठी मर्यादा आहेत. त्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या पाण्याची गुणवत्ता तपासून, योग्य प्रक्रिया करून केवळ चारा पिकांसाठी त्याचा वापर करता येईल का, याची तांत्रिक तपासणी केली जात आहे.

​प्रायोगिक तत्त्वावर ‘टेस्ट केस’ म्हणून उपक्रम
​हा संपूर्ण उपक्रम ‘टेस्ट केस’ (प्रायोगिक तत्त्वावर) म्हणून राबवला जाणार आहे. ५० हेक्टरवर ज्वारी लागवडीचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास आगामी काळात जिल्ह्यातील इतर भागांतही अशा प्रकारे सांडपाण्याचा पुनर्वापर करून चारा निर्मितीला मोठी गती मिळू शकेल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

​पाणी उपसा बंदीच्या आदेशाचा फेरविचार करण्याची मागणी-
​सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राघूचीवाडी तलावातील पाणी उपशावर बंदी आहे. त्यामुळे मोठा पाणीसाठा उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना त्याचा वापर करता येत नाही. सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय निकषांचे तंतोतंत पालन करून या पाण्याचा केवळ चारा लागवडीसाठी वापर करण्यास विशेष परवानगी द्यावी आणि उपसा बंदीच्या आदेशाचा फेरविचार करावा, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india