निवडणूक संपली,राजकारण संपवा! तुळजापूर शहराच्या विकासासाठी एकजूट व्हा – आ. राणाजगजीतसिंह पाटील
तुळजापूर | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पुण्य पावन नगरीत नूतन नगराध्यक्ष विनोद उर्फ पिंटू गंगणे यांनी पदभार स्वीकारला.नगरसेवकाला आपल्या प्रभागाचा आणि शहराचा विकास महत्त्वाचा असतो. निवडणूक संपली असून आता राजकारण नको, तर विकासाचे राजकारण हवे. मतभेद बाजूला ठेऊन सर्व नगरसेवकांनी तुळजापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकदिलाने काम करावे, असे ठाम व आक्रमक आवाहन आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले.
सोमवारी (दि. २९) तुळजापूर नगरपरिषदेचे नूतन नगराध्यक्ष विनोद उर्फे पिंटू गंगणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महंत तुकोजी बुवा, महंत मावशीनाथ बुवा, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जि. प. अध्यक्ष सौ. अर्चना पाटील,युवा नेते मल्हार पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सज्जनराव साळुंके, संतोष परमेश्वर यांच्यासह नगरपरिषद मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे उपस्थित होते.आ. पाटील पुढे म्हणाले की, निवडणूक काळात तुळजापूरच्या राजकारणाने खालचा थर गाठला होता. आरोप–प्रत्यारोपांच्या लढाईत शहराची प्रतिमा मलीन होत असल्याचे कुणालाही भान राहिले नव्होते. मात्र आता वेळ आली आहे ती शहरहिताला प्राधान्य देण्याची.
शारदीय नवरात्रयात्रा अनुदान वाढीव मिळावे यासाठी लवकरच मुख्यमंत्री यांच्याकडे १० कोटी रुपयांची मागणी केली जाईल, अशी घोषणा करतानाच, महायुती सरकारकडून तुळजापूरच्या विकासासाठी १९०० कोटी रुपयांचा निधी दिला जात असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.तसेच धाराशिव–तुळजापूर–सोलापूर रेल्वे मार्गाचे काम वेगात सुरू असून या विकास प्रवाहाला गती देण्यासाठी नूतन नगराध्यक्षांच्या पाठीशी सर्वांनी भक्कमपणे उभे राहावे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रवेश करण्यात आला.
यानंतर नूतन नगराध्यक्ष विनोद उर्फे पिंटू गंगणे यांनी मुख्याधिकारी रणदिवे यांच्या हस्ते अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यावेळी नूतन नगराध्यक्षांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
त्यानंतर नगरपरिषदेच्या वतीने सर्व नगरसेवकांचाही सत्कार करण्यात आला.
विकासासाठी राजकीय सीमा ओलांडण्याचा स्पष्ट संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.






