Best News Portal Development Company In India

कोल्हापूर मध्ये मंदिर प्रीमियर लीगचे दुसरे पर्व : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे दोन संघ सज्ज!

कोल्हापूरमध्ये मंदिर प्रीमियर लीगचे दुसरे पर्व; श्री तुळजाभवानी संस्थानचे दोन संघ सज्ज !

तुळजापूर प्रतिनिधी / देशभरातील विविध मंदिर संस्थानांमधील कर्मचाऱ्यांना एकत्र आणून आपसातील एकोपा, संघभावना आणि क्रीडासंस्कृती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षापासून कोल्हापूर येथे मंदिर प्रीमियर लीग या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेचे यंदाचे दुसरे पर्व दिनांक १४, १५ व १६ फेब्रुवारी २०२६ रोजी शास्त्री नगर मैदान, कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत राज्यासह देशभरातील विविध मंदिर संस्थानांचे क्रिकेट संघ सहभागी होणार असून, त्यात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे दोन संघ मैदानात उतरणार आहेत. या स्पर्धेसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे दोन्ही संघ पूर्ण तयारीनिशी सज्ज झाले असून खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या क्रिकेट संघासाठी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते श्री तुळजाभवानी देवींची महाआरती करण्यात आली. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी मंदिर संस्थानच्या संघाने उत्तम खेळाचे प्रदर्शन करून स्पर्धेत यश संपादन करावे, अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, लेखाधिकारी संतोष भेंकी यांच्यासह स्पर्धेत सहभागी होणारे सर्व खेळाडू, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार व तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या हस्ते श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या क्रिकेट संघाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी दोन्ही संघ उत्कृष्ट खेळ करून संस्थानाचे नाव उज्वल करतील, असा विश्वास तहसीलदार तथा (व्यवस्थापक) प्रशासन माया माने यांनी व्यक्त केला.

मंदिर प्रीमियर लीगच्या माध्यमातून देशभरातील विविध मंदिर संस्थानांमधील कर्मचारी एकत्र येत असून, या स्पर्धेमुळे केवळ क्रीडासंस्कृतीच नव्हे तर सामाजिक एकोपा, सौहार्द आणि आपुलकीचे वातावरण निर्माण होत आहे. कोल्हापूरमध्ये होणाऱ्या या क्रिकेट लीगकडे क्रीडाप्रेमींसह सर्वांचे लक्ष लागले असून, स्पर्धेबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india