Best News Portal Development Company In India

स्पेन मधील भाविक जेवियर यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन : दहा वर्षाच्या भारत प्रमाणात 50 हजार किलोमीटर पदयात्रेचा अनोखा प्रवास!

स्पेनमधील भाविक जेवियर यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन; दहा वर्षांच्या भारतभ्रमणात ५० हजार किमी पदयात्रेचा अनोखा प्रवास!

तुळजापूर प्रतिनिधी :- स्पेनच्या बार्सिलोना येथील ६६ वर्षीय भाविक जेवियर यांनी बुधवार, दिनांक ११ फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले.

जेवियर हे गेल्या दहा वर्षांपासून भारतभ्रमण करत असून त्यांनी भारतातील धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरांचा सखोल अनुभव घेतला आहे. त्यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात १४ ऑक्टोबर २०१५ रोजी राजस्थानातील पुष्कर येथून केली होती. विशेष बाब म्हणजे त्यांनी ही यात्रा पदयात्रेच्या माध्यमातून पूर्ण केली असून या कालावधीत त्यांनी तब्बल ५० हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे.

या दीर्घ पदयात्रेदरम्यान जेवियर यांनी चार धाम, बारा ज्योतिर्लिंग, तसेच गंगोत्री, यमुनोत्री, लेह–लडाख, काश्मीर, कन्याकुमारी यांसह भारतातील जवळपास सर्व महत्त्वाच्या धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी देत दर्शन घेतले. भारताची अध्यात्मिक परंपरा, विविधता आणि संस्कृती यामुळे आपण अत्यंत प्रभावित झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सन २०२२ मध्ये आपली पदयात्रा पूर्ण केल्यानंतर जेवियर सध्या बस आणि रेल्वेने प्रवास करत असून भारतातील प्रमुख धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी देत आहेत. त्याच प्रवासाचा भाग म्हणून ते बुधवारी तुळजापूरात दाखल झाले होते. बुधवारी रात्री त्यांनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले.

तुळजाभवानी देवी ही शक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक असून तिचे दर्शन घेणे हे आपल्या भारतभ्रमणातील एक महत्त्वाचे अध्यात्मिक क्षण असल्याची भावना जेवियर यांनी व्यक्त केली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india