पाच महिन्यांपासून शौचालयाचे काम रखडले; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
तुळजापूर : शहरातील सिटी सर्वे नं. १३८ मधील शासकीय जागेत भाविकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सार्वजनिक शौचालयाचे काम गेल्या पाच महिन्यांपासून बंद असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार व नगर परिषदे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित जागेत पूर्वी निजामकालीन शौचालय होते. नगर परिषद तुळजापूर ने भाविकांच्या सोयीसाठी नव्या सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम ठेकेदारामार्फत सुरू केले होते. मात्र, कोणतेही ठोस कारण न देता ठेकेदाराने हे काम गेल्या पाच महिन्यांपासून थांबवले आहे. हे काम कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या कारणामुळे बंद आहे, याची माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, शौचालयाचे काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदारास देयके अदा केल्यास त्यास मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तुळजापूर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे येणाऱ्या हजारो भाविकांसाठी ही सुविधा अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. काम तातडीने सुरू न झाल्यास शिवसेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर शिवसेना शहर प्रमुख रमेश चिवचिवे यांची स्वाक्षरी आहे.







