Best News Portal Development Company In India

तुळजापूर खुर्द येथील तुळजाई मंडळास राज्य शासनाचा जिल्हास्तरीय पुरस्कार!

तुळजापूर खुर्द येथील तुळजाई मंडळास राज्य शासनाचा जिल्हास्तरीय पुरस्कार
तुळजापूर : तुळजापूर खुर्द येथील तुळजाई सांस्कृतिक व क्रीडा मंडळास महाराष्ट्र शासनाचा ‘सार्वजनिक गणेशोत्सव–२०२५’ अंतर्गत राज्यस्तरीय जिल्हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार धाराशिव येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी मा. श्री. कीर्ती किरण पुजार यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप ३० हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र असे आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी मा. श्री. गोडसे साहेब उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना तुळजाई मंडळाचे अध्यक्ष श्री. नानासाहेब भोजने, सचिव श्री. विकास भोजने व सदस्य श्री. दीपक माळी उपस्थित होते. तुळजाई मंडळाचे हे ३७वे वर्ष असून मंडळ वर्गणीमुक्त गणेशोत्सव साजरा करते, हे त्यांचे विशेष वैशिष्ट्य आहे.
मंडळाच्या वतीने समाजोपयोगी अनेक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. यामध्ये रक्तदान शिबिरे, पशुवैद्यकीय शिबिरे, आरोग्य शिबिरे, ज्येष्ठ नागरिकांना रेडिओ वाटप, नदी खोलीकरण, दुष्काळी परिस्थितीत कुपनलिकांच्या माध्यमातून पाणीपुरवठा, तसेच सन १९९७ साली स्थापन केलेल्या तुळजाई पतसंस्थेमार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे. याशिवाय ‘बँक आपल्या दारी’, मोफत लर्निंग लायसन्स, महिला सक्षमीकरण, ज्येष्ठांना काठी वाटप, तसेच न.प. शाळा क्र. ३ येथील शिक्षकांसाठी ‘माझी शाळा माझे गुरुजी’ उपक्रमही राबविण्यात आले आहेत.
तुळजाई मंडळास सन २००८ मध्ये महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार मिळाला असून, जिल्हा पोलीस दल, रोटरी क्लब व ‘एक गाव एक गणपती’सह आतापर्यंत २९ विविध पुरस्कारांनी मंडळाचा गौरव झाला आहे. या नव्या पुरस्कारामुळे तुळजाई मंडळाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सदर पुरस्कार मंडळाने तुळजापूर खुर्द व तुळजापूर शहरवासीयांना समर्पित केल्याचे जाहीर केले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india