Best News Portal Development Company In India

सोलापूर सायबर पोलिसांची दमदार कामगिरी ; ५३ हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांच्या ताब्यात – CEIR पोर्टलच्या माध्यमातून ७.९५ लाखांचे हँडसेट हस्तगत!

सायबर पोलिसांची दमदार कामगिरी; ५३ हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांच्या ताब्यात
– CEIR पोर्टलच्या माध्यमातून ७.९५ लाखांचे हँडसेट हस्तगत
सोलापूर : सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांनी गहाळ व चोरीस गेलेल्या मोबाईल शोध मोहिमेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून हरवलेले तब्बल ५३ अँड्रॉइड मोबाईल CEIR पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक विश्लेषण करून शोधण्यात आले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत ७ लाख ९५ हजार रुपये इतकी आहे.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील नागरिकांचे गहाळ मोबाईल शोधण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचे निर्देश त्यांनी सायबर पोलीस ठाण्याला दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे यांच्या नेतृत्वाखाली CEIR पोर्टल टीमने तांत्रिक विश्लेषण करत शोधमोहीम हाती घेतली.
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमधून नोंद झालेल्या गहाळ मोबाईलचा माग काढत CEIR पोर्टलच्या साहाय्याने संबंधित मोबाईल शोधण्यात आले. विविध कंपन्यांचे एकूण ५३ मोबाईल हस्तगत करण्यात सायबर पोलिसांना यश आले.
हस्तगत करण्यात आलेले मोबाईल मूळ खरेदीदारांच्या ताब्यात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांचेही मार्गदर्शन लाभले. सायबर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथील पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे तसेच CEIR पोर्टलचे कामकाज पाहणारे पोशि/११८२ जाधव यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
सायबर पोलिसांच्या या यशस्वी मोहिमेमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी CEIR पोर्टल प्रभावी ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india