Best News Portal Development Company In India

13 महिन्यांच्या चिमुकलीचा चुलत्याकडून खून; 24 तासांत आरोपी तामलवाडी पोलिसांच्या ताब्यात !

13 महिन्यांच्या चिमुकलीचा चुलत्याकडून खून; 24 तासांत  आरोपी तामलवाडी पोलिसांच्या ताब्यात!
तुळजापूर प्रतिनिधी : तामलवाडी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका अतिशय धक्कादायक घटनेत 13 महिन्यांच्या चिमुकलीचा तिच्याच चुलत्याने खून केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, तामलवाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या गंभीर गुन्ह्याचा छडा लावून आरोपीस अटक केली.
दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी महादेव माने (रा. गवळेवाडी) यांनी आपल्या 13 महिन्यांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने घरातून पळवून नेल्याची तक्रार तामलवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीवरून गु.र.नं. 29/2026, कलम 137(2) बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक   गोकुळ ठाकूर करत असताना, गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून धक्कादायक बाब समोर आली. पीडित मुलीचा चुलता शंकरेश्वर माने यानेच अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीने 27 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 ते 5.30 वाजण्याच्या सुमारास मुलीला घरातून उचलून नेले. त्यानंतर शेतात नेऊन तिचा गळा दाबून खून केला. एवढ्यावर न थांबता, कोयत्याच्या सहाय्याने मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले व जवळील चारीमध्ये पुरून टाकल्याची कबुली त्याने दिली.
आरोपीच्या कबुलीनुसार पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतला आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या भावाच्या पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपीच्या मनात संताप होता. तसेच, पीडित मुलगी आपल्या भावाची नसल्याचा संशय त्याला होता. या रागातूनच त्याने हे अमानुष कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
हा गुन्हा मा. पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवघ्या 24 तासांत उघडकीस आणला. या पथकात पोलीस हवालदार जुबेर काझी, आकाश सुरनर, नितीन भोसले तसेच पोलीस अंमलदार सूरज नरवडे, नझीर बागवान, उमेश माने, तुराब शेख व मनोज गोबाडे यांचा समावेश होता.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नातेसंबंधांमधील संशय आणि संताप किती भीषण रूप धारण करू शकतो, याचे हे भयावह उदाहरण ठरले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india