Best News Portal Development Company In India

श्री तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी उत्साहात साजरी ; तुळजापूर !

श्री तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी उत्साहात साजरी ; तुळजापूर!

 

तुळजापूर प्रतिनिधी :

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे आज सालाबाद प्रमाणे पारंपारिक पद्धतीने रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक धार्मिक विधींसह साजरा करण्यात आला. देवीच्या चरणी विशेष पूजा, अभिषेक आणि पारंपरिक रंगोत्सवामुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेला.

 

रंगपंचमीच्या निमित्ताने सकाळी लवकर देवीचा अभिषेक व विशेष पूजा करण्यात आली. त्यानंतर देवीला पांढराशुभ्र शालू नेसविण्यात आला. या शालूवर सप्तरंगांची उधळण करून पारंपरिक पद्धतीने रंगपंचमीचा उत्सव साजरा करण्यात आला. महंत व पुजाऱ्यांनी देवीला रंग अर्पण करून हा धार्मिक सोहळा पार पाडला. आशा पारंपारिक उपक्रमामुळे जगभरामध्ये श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थान प्रसिद्ध आहे.

 

रंगपंचमीच्या दिवशी देवीची विशेष पूजा करून तिला रंग अर्पण करण्याची प्राचीन परंपरा आहे. या परंपरेनुसार देवीला प्रथम रंग अर्पण केल्यानंतर मंदिरातील पुजारी आणि उपस्थित भाविक एकमेकांना रंग लावून उत्सवाचा आनंद साजरा करतात. या सोहळ्यात प्रामुख्याने नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला.

 

या उत्सवप्रसंगी मंदिरातील धार्मिक व प्रशासकीय मान्यवर उपस्थित होते. यामध्ये महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, पुजारी बांधव तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी पारंपरिक पद्धतीने देवीला रंग अर्पण करून रंगपंचमीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला.

 

रंगपंचमीच्या निमित्ताने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लावून रंगोत्सवाचा आनंद घेतला. ताल सूर आणि भक्ती यामुळे मंदिर परिसरात धार्मिक वातावरण आणि उत्साहाचे चित्र पाहायला मिळाले.

अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे आणि संस्कृती जपण्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान ची ख्याती अगदी जगभर आहे. दीनदुबळ्यांची दाता आई तुळजाभवानी ज्यांनी स्वराज्य निर्माण करण्याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज यांना दिली. तोच वारसा जपण्याचा प्रयत्न मंदिर संस्थान करत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india