अनाधिकृत बांधकामावरून वाद; युवकावर विटेने हल्ला, तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
तुळजापूर / प्रतिनिधी :
तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथे अनाधिकृत बांधकामाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका युवकावर लाथाबुक्क्यांनी व सिमेंटच्या विटेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पुढील तपास पण चालू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कदमवाडी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथील इंद्रजित सूर्यभान कदम हे गावात अनाधिकृत बांधकाम करत असल्याचे सांगितले जाते. दि. 1 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास हे बांधकाम सुरू असताना त्याच गावातील गोरख मच्छिंद्र मोरे (वय 35 वर्षे) यांनी त्या बांधकामाबाबत विचारणा केली.
फिर्यादीने बांधकामाबाबत विचारणा केल्यामुळे आरोपी संतापला. त्यानंतर आरोपीने गोरख मोरे यांना शिवीगाळ करत धमक्या दिल्या. वाद वाढत गेल्यानंतर आरोपीने मोरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने जवळच असलेली सिमेंटची वीट उचलून फिर्यादीवर हल्ला केला. या हल्ल्यात गोरख मोरे गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर जखमी गोरख मोरे यांनी उपचार घेतल्यानंतर 7 मार्च 2026 रोजी तामलवाडी पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची फिर्याद दिली. या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी आरोपी इंद्रजित सूर्यभान कदम यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 118(2) आणि 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे कदमवाडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनाधिकृत बांधकामावरून वाद वाढत असल्यामुळे गावातील नागरिकांनी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा प्रकारच्या बांधकामांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी केली आहे.
तामलवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.





