श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने “लमाण(बंजारा)” जमातीचे सर्वेक्षण
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
येथील श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील पदवी व पव्युत्तर समाजशास्त्र विभागाच्या वतीने मंगळवार दिनांक १० मार्च रोजी मुळज तांडा येथील लमाण (बंजारा) जमातीच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचे सखोल सर्वेक्षण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. प्रदीप पाटील आणि डॉ. डी . व्ही. पडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी साठ कुटुंबाच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे अध्ययन केले.
या सर्वेक्षणामध्ये स्त्री पुरुष कुटुंब प्रमुखांच्या मुलाखतीतून असे निदर्शनास आले की त्यांच्यात विधवा-विधूरांचे प्रमाण अल्प दिसून आले. तसेच लमाण जमातीत आजही संयुक्त कुटुंब पद्धतीला प्राधान्य, सामान्य जीवन पद्धती,झोपडी आणि कच्ची मातीची घरे, घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प, गरिबीचे प्रमाण अधिक असून पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न आणि मजुरीचे प्रमाण अधिक असल्याचे सर्वेक्षणात आढळले. शैक्षणिक स्थिती चिंताजनक आहे. सामाजिक दृष्ट्या या समाजावर धार्मिक सण उत्सव साजरे करण्यावर भर आढळतो. बालविवाह, स्वच्छता आणि आरोग्य बाबत अनास्था आढळून आली.
या सर्वेक्षणातून मिळालेल्या निष्कर्षांवर आधारित स्थानिक स्तरावर धोरणे राबविल्यास लमाण समाजाच्या विकासाला गती मिळेल. शिक्षण, आरोग्य, रोजगार, कौशल्य सुधार, शासकीय योजनांबाबत जागृती यावर उपाययोजना केल्यास या समाजाला मुख्य प्रवाहात आणता येईल.असे अभ्यासाअंती लक्षात आले. सदरील सर्वेक्षणसाठी समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.पी.डी.पाटील, डॉ. डी. व्ही. पडोळे, डॉ. सुमेध राजूरकर यांचे मार्गदर्शन लाभले. महविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय अस्वले, उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, डॉ. पद्माकर पिटले, सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमाबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या








