तलमोड. आनंद सुर्यवंशी.
तालुक्यातील मुळजचे ग्रामदैवत श्री जटाशंकर यात्रा महोत्सवानिमित्त गुरुवारी, (दि १९) गुढीपाडव्या दिवशी सोयराप्पा परिवाराच्या श्री च्या काठीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. तर महादेवाच्या कावडीची दुपारी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. कावड दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक व सामाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील मुळज येथे सीमावर्ती भागातील भाविकांचे श्रद्धास्थान व प्राचीन उत्कृष्ट शिल्प कलेचा उत्तम नमुना असलेले श्री जटाशंकर हेमाडपंती मंदिर आहे. मंदिरात परिसरात विविध देवदेवताच्या मुर्ती आहेत. दर वर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवारी सकाळी गुढीपाडव्या दिवशी सोयराप्पा घराण्यातील श्री च्या काठीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी तानाजी बिराजदार, व्यंकट बिराजदार, नागेश बिराजदार, तात्याराव बिराजदार, शिवाजी बिराजदार, पंढरी बिराजदार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, व्हाईस चेअरमन सतिश जाधव, धैर्यशील चालुक्य, ग्रा पं सदस्य मोहीत चालुक्य, विष्णू बिराजदार आदी उपस्थित होते. यात्रा काळात गुरुवारी, (दि २६) रोजी दुपारी शिवपार्वती विवाह सोहळा आणि श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. मंदिर परिसरात बुधवारी, (दि ०१) रात्री जटाशंकर संगीत महोत्सव, महाप्रसाद व पहाटे आकर्षक शोभेच्या दारूकाम, काठी व श्री ची छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती दिवशी गावातील हनुमान मंदीरात गुरुवारी, (दि ०२) हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर हेमाडपंती मंदिरापासून सकाळी अकरा वाजता गावातील प्रमुख मार्गावरून नगारे, ढोल, ताशा, बॅन्ड, हलगी, टाळ, मृदंगाच्या निनादात व आकर्षक फटाक्यांच्या आतिशबाजीत मानाची श्रीची काठी व पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या दरम्यान दहीहंडी काला, भारूड, पोवाडे आदी कार्यक्रम पार पडणार आहेत.
जंगी कुस्ती फडाचे आयोजन.
देवस्थान परिसरात शुक्रवारी, (दि ०३) नामवंत मल्लांच्या जंगी कुस्ती फड रंगणार आहे. यातील विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. रात्री समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम तर शनिवारी, (दि ०४) रोजी पहाटे श्री ची महाआरती व प्रसाद वाटपाने यात्रेची सांगता होणार आहे. यात्रा महोत्सवातील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान व्यवस्थापन समिती, काठीचे मानकरी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.






