“रोहित पवार हे रावण शोधणारे बारामतीतील बिभीषण” – अभिजीत आपटे
रामायणात जसा रावणाच्या कपटकारस्थानांमुळे बिभीषणाला सत्याच्या बाजूने उभं राहावं लागलं, तसंच आजच्या राजकारणातही एक बिभीषण उभा राहताना दिसतो. आदरणीय अजित पवार यांच्यासारख्या अजातशत्रू नेत्याचा घात जर झाला असेल, तर तो बाहेरून नव्हे तर घरातूनच झालेला असू शकतो, असा गंभीर आरोप उद्योग विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अभिजीत आपटे यांनी केला आहे.
विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी, दादांपासून कोणालाही भीती नव्हती, असुरक्षितता नव्हती. मात्र स्वतः उभं केलेलं झाड, स्वतः वाढवलेला पक्ष जर दुसऱ्यांच्या सावलीत जात असेल, त्याची फळं इतरांकडे जात असतील, तर त्या आसूयेचा जन्म होणं स्वाभाविक आहे. आणि हीच आसूया कधीकधी सूडाच्या भावनेत रूपांतरित होऊ शकते.
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार हे बिभीषणाची भूमिका पार पाडत आहेत. “रावण” कोण आहे हे शोधण्यासाठी बिभीषणाची गरज असते, आणि ती भूमिका रोहित पवार सक्षमपणे निभावत आहेत, असं आपटे यांनी स्पष्ट केलं.
कर्नाटकमध्ये रोहित पवार यांनी दाखल केलेली FIR ही या संपूर्ण प्रकरणात अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, “दादांच्या जाण्याचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार होता?” हा प्रश्न उलगडण्यासाठी ती निर्णायक ठरेल, असंही त्यांनी नमूद केलं.
भारतीय जनता पार्टी किंवा इतर कोणताही पक्ष दादांचा घात करू शकत नाही, असा ठाम विश्वास दादांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे. त्यामुळे हा घात “गल्लीतून, पण धागे दिल्लीत जोडलेले” अशा पद्धतीने झाला असल्याचा गंभीर आरोप अभिजीत आपटे यांनी केला.






