Best News Portal Development Company In India

सावधान! तुळजापुरात सोन्याच्या बिस्किटाचे आमिष दाखवून वृद्धेची फसवणूक; ९० हजारांचे दागिने लंपास !

सावधान! तुळजापुरात सोन्याच्या बिस्किटाचे आमिष दाखवून वृद्धेची फसवणूक; ९० हजारांचे दागिने लंपास !
​तुळजापूर प्रतिनिधी: चोरटे तुपाशी आणि नागरिक उपाशी अशी म्हणण्याची वेळ सध्या आली आहे.
धार्मिक क्षेत्र असलेल्या तुळजापूर शहरात भाविकांना लुटण्याचे प्रकार सुरूच असून, एका वृद्ध महिलेला सोन्याच्या बिस्किटाचा बनाव करून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या बसस्थानक परिसरात दोन भामट्यांनी एका ६० वर्षीय महिलेचे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
​सोलापूर येथील सैफुल परिसरातील रहिवासी असलेल्या पार्वती कृष्णकुमार राठोड (वय ६०) या २६ मार्च रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकावरून जात होत्या. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. “आम्हाला सोन्याची दोन बिस्किटे सापडली आहेत,” असा बनाव त्यांनी रचला.
​भामट्यांनी पार्वती राठोड यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना एक खोटे सोन्याचे बिस्किट दिले. त्या बदल्यात त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मिनी गंठण (किंमत अंदाजे ९०,००० रुपये) हातचलाखीने काढून घेतले आणि तिथून पसार झाले.
​आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पार्वती राठोड यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अनोळखी व्यक्तीने रस्त्यात सोने सापडल्याचे किंवा स्वस्त सोने देण्याचे आमिष दाखवल्यास त्याला बळी पडू नका. अशा संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.
सध्या तुळजापुरातील नागरिकांना एक प्रश्न पडत आहे. तुळजापूर बस स्टँड वरती पोलीस बंदोबस्ताला असताना सुद्धा असे प्रकार घडतातच कसे? काल परवाच उमरग्याच्या महिलेचे मनी मंगळसूत्र हातोहात लंपास करण्यात आले. अशा भुरट्या चोरांचा बंदोबस्त कधी होणार आहे?

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india