उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
तालुक्यातील मुळज येथील ग्रामदैवत श्री जटाशंकर देवस्थान परिसरात गुरुवारी, (दि २६) शिव पार्वती विवाह आणि श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सर्व जाती धर्मातील हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.
सीमावर्ती भागांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुळज ता. उमरगा येथे उत्कृष्ट शिल्प कलेचा उत्तम नमुना असलेले जागृत श्री जटाशंकर हेमाडपंती मंदिर आहे. प्राचीन काळा पासून देवस्थान यात्रा दरवर्षी गुढी पाडव्या पासून सोयराप्पा परिवारातील श्री च्या काठीची प्रतिष्ठापनेने सुरू होते. यात्रा काळात शिखर शिंगणापूर नंतर चैत्र शुद्ध अष्टमीला शिव पार्वती विवाह सोहळ्याची परंपरा ग्रामस्थ आजही सर्व धर्म समभाव, सामाजिक एकोपा, राष्ट्रीय एकात्मतेसह मोठय़ा भक्ती भावाने जोपासत आहेत. सोहळ्यात मान पान आहेर स्विकारला जात नाही. कसल्याही प्रकारचे निमंत्रण दिले जात नाही. पुणे येथील राकेश मुगळे यांनी मंदिराचा संपूर्ण गाभार्यात विविध सुगंधी फुलांनी आरास केली होती. गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास वेदमूर्ती आशोक जोशी, गोपाळ जोशी, केतन जोशी, दिनेश जोशी, नागेश जोशी महेश गुरव यांच्या पौरोहित्याखाली मंत्रोच्चारात विधीवत पुजा करण्यात आली. पाच मंगलाष्टकात भाविकांनी अक्षता टाकल्या. शेवटची मंगलाष्टके संपताच बॅन्ड, ढोल, ताशाचा गजर व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर दुपारी बारा वाजता गुलाल पुष्पवृष्टीत श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी जिपचे माजी उपाध्यक्ष बाबा पाटील, काठीचे मानकरी तानाजी बिराजदार, व्यंकट बिराजदार, पंढरी बिराजदार, तात्याराव बिराजदार, माजी व्हाईस चेअरमन सतिश जाधव, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सुधाकर चव्हाण, भारत शिक्षण संस्थेचे संचालक दिगंबर बिराजदार, विजय चव्हाण, मारूती चव्हाण, देविदास चव्हाण, हभप कमलाकर महाराज आदींसह हजारो भाविक सहभागी झाले होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. सोहळ्यातील भाविकांना चंद्रकांत कुलकर्णी त्रिकोळीकर, पुणे येथील महादेव चव्हाण, दत्ता बिराजदार, मधुकर जमादार, लिंगायत समाज बांधवासह ग्रामस्थाच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला. तर पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
*पाठक दाम्पत्याकडून पार्वतीचे कन्यादान!*
जटाशंकर देवस्थान यात्रोत्सवातील शिव पार्वती विवाह सोहोळ्यात अरूण व सविता या पाठक दाम्पत्यांनी परंपरेनुसार पार्वतीचे कन्यादान केले. दरम्यान विवाह सोहळ्यासाठी सकाळ पासून मंदिराकडे जाणारा रस्ता भाविकाच्या गर्दीने फुलून गेला होता. कांही काळ रस्त्यावर वाहतूकीची कोंडी झाली होती.
उमरगा – जटाशंकर देवस्थान येथील शिव पार्वती धार्मिक विवाह सोहळ्यात पाठक दांपत्यानी पार्वतीचे कन्यादान केले, यावेळी हजारो भाविक वर्हाडी उपस्थित होते.







