Best News Portal Development Company In India

उमरगा वन परिक्षेत्रातील गैरकारभाराविरोधात अँड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे निवेदन; आमदार प्रवीण स्वामी यांची कारवाईची ग्वाही!

*उमरगा वन परिक्षेत्रातील गैरकारभाराविरोधात अँड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे निवेदन; आमदार प्रवीण स्वामी यांची कारवाईची ग्वाही*

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

उमरगा येथील वन परिक्षेत्र कार्यालयातील कथित गैरकारभार, अधिकारी-कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, बनावट कर्मचारी प्रकरणे आणि विविध अनियमितता याबाबत ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार, उमरगा यांना दि. ३०(सोमवार) रोजी सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात वन विभागाच्या कामकाजातील गंभीर त्रुटींचा उल्लेख करत तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वी संबंधित कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान एकही अधिकारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. केवळ दोन कर्मचारी उपस्थित होते, तसेच मुख्य जबाबदार अधिकारी नियमितपणे कार्यालयात येत नसल्याची माहितीही समोर आली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांकडे अधिकृत ओळखपत्र नसल्याचे, तसेच बनावट कर्मचाऱ्यांची शक्यता नाकारता येत नसल्याचेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

वन विभागाच्या कामकाजाशी संबंधित इतर गंभीर बाबींचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये अधिकारी नियमित अनुपस्थित राहणे, शासकीय वेतन घेत असूनही जबाबदाऱ्या पार न पाडणे, शासकीय योजनांची अंमलबजावणी न होणे व निधी अपहाराचा संशय, वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांना धोका निर्माण होत असताना उपाययोजना न करणे, वन्यप्राण्यांसाठी पाणी व चाऱ्याची कोणतीही व्यवस्था नसणे, जंगलतोड व वृक्षारोपणाच्या नावाखाली भ्रष्टाचार होण्याची शक्यता या सर्व बाबींवर तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी तहसीलदार कार्यालयात उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. प्रवीण स्वामी तसेच पाणंद रस्ते समितीचे सहअध्यक्ष व भाजपा युवा नेते मा. शरण पाटील हे उपस्थित होते. फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेत आमदार प्रवीण स्वामी यांनी या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

फाउंडेशनच्या वतीने इशारा देण्यात आला आहे की, जर या प्रकरणात तातडीने कार्यवाही झाली नाही, तर बेमुदत आमरण उपोषणासारखा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी.
या निवेदनावर राजू बटगिरे, रोहित वाघमारे, दीपक झाकडे, करीम शेख, धानय्या स्वामी, प्रदीप चौधरी, बबीता मदने, शबाना शेख, सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, अँड. ख्वाजा शेख, प्रदीप मोरे, अँड. अर्चना जाधव आदींसह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india