Best News Portal Development Company In India

कर्तृत्ववान शिक्षिकेचा सेवापूर्ती सत्कार उत्साही वातावरणात आनंदात सोहळा संपन्न..! उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

कर्तृत्ववान शिक्षिकेचा सेवापूर्ती सत्कार उत्साही वातावरणात आनंदात सोहळा संपन्न.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
ज्ञानसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि विद्यार्थ्यांप्रती अपार जिव्हाळा जपणाऱ्या श्रीमती उषा विठ्ठलराव सगर यांच्या सेवापूर्ती निमित्त श्रीकृष्ण विद्यालय, गुंजोटी येथे आयोजित भव्य सत्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी व भावनिक वातावरणात दिमाखात संपन्न झाला.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री प्रभाकरराव हिरवे (तात्या) होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री दिलीपजी गरुड सर यांची उपस्थिती लाभली. यावेळी संस्थेच्या स्वीकृत सदस्या श्रीमती वैशालीताई कदेरे, संस्था समन्वयक श्री गोरख घोडके सर, प्रशासकीय सहाय्यक प्रा. अभयकुमार हिरास सर, तसेच मा. श्री अरुण रेणके सर, मा. श्री किरण सगर सर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रविराज पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री सत्यवान भालेराव सर, पर्यवेक्षक श्री अविनाश पाटील सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री बसवराज पुरंत सर आणि उपप्राचार्य श्री मालखरे सर यांची मान्यवर उपस्थिती कार्यक्रमास लाभली.

कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रविराज पाटील सर यांनी करून, सगर मॅडम यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील उल्लेखनीय कार्य, शैक्षणिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण आढावा मांडला.

या प्रसंगी सत्कारमूर्ती श्रीमती उषा सगर मॅडम व त्यांचे पती श्री दिलीप सगर यांचा श्रीकृष्ण शिक्षण संस्था, प्राथमिक, माध्यमिक, व्यावसायिक अभ्यासक्रम विभाग, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय तसेच सोसायटीच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या कार्याचा गौरव केला.

प्रमुख पाहुणे श्री दिलीप गरुड सर यांनी आपल्या मनोगतात सगर मॅडम यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून सांगितले. त्यांनी नमूद केले की, अनेक अडचणींना सामोरे जात असतानाही सगर मॅडम यांनी कधीही आपले कर्तव्य ढळू दिले नाही; उलट प्रत्येक परिस्थितीत ठामपणे उभे राहून त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशा व मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोनातून अनेकांना प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

तसेच प्रा. अभयकुमार हिरास सर, श्री मालखरे सर, श्री अविनाश पाटील सर, श्री बसवराज पुरंत सर आणि प्रा. निगडे सर यांनीही मनोगत व्यक्त करून सगर मॅडम यांच्या कार्याचा गौरव केला.

अध्यक्षीय समारोप करताना श्री गोरख घोडके सर यांनी सगर मॅडम यांच्या कार्याची उजळणी करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि यशस्वी भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास सर्व विभागातील शिक्षकवृंद, कर्मचारीवर्ग तसेच सगर परिवारातील आप्तेष्ट व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात भावनिक क्षणांसह आनंददायी वातावरण अनुभवायला मिळाले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री सोमशंकर कुंभार सर यांनी प्रभावी शैलीत केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती वर्षा हंचाटे यांनी मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india