Best News Portal Development Company In India

उमरगा तालुक्यात हादरवणारी घटना… बेरडवाडीत पतीने केली पत्नी आणि आठ वर्षाच्या चिमुकलीची कुऱ्हाडीने हत्या !उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव .

उमरगा तालुक्यात हादरवणारी घटना…
बेरडवाडीत पतीने केली पत्नी आणि आठ वर्षाच्या चिमुकलीची कुऱ्हाडीने हत्या
.उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
दि. ७ उमरगा तालुक्यातील बेरडवाडी (भुसणी) येथे एका निर्दयी पतीने आपल्या पत्नीची आणि आठ वर्षांच्या निरागस मुलीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.७) रोजी पहाटे उघडकीस आली. या भीषण घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री उशीरा घरात पती, पत्नीचे भांडण झाले असावे, त्यातून दुहेरी हत्याकांड झाले. परंतू यामागे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान वडिलांचे रौद्र रूप पाहून मुलगा घराबाहेर पळून गेल्याने तो वाचला आहे. पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी अजित अपन्ना वासुदेव हा स्वतः मुरूम पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांसमोर कुऱ्हाडीने वार करून पत्नी लिंबूबाई व मुलगी मानसी यांचा खून केल्याची कबुली दिली. स्वतःच्या पत्नीचा आणि पोटच्या मुलीचा त्याने काटा काढल्याचे ऐकताच पोलीसही चक्रावून गेले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीपान दहिफळे यांनी तातडीने फौजफाट्यासह बेरडवाडी गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि उत्तरीय तपासणीसाठी मुरूम ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले.
​या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांनी मुरूम पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. दरम्यान या प्रकरणी नागनाथ शेंमले (रा. वाडी कासारशिरशी, ता. निलंगा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरूम पोलीस ठाण्यात आरोपी अजित अपन्ना वासुदेव याच्यावर भादंवि कलम ३०२ (खून) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास मुरूम पोलीस करत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india