जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद प्रशाला (माध्यमिक )मुलांची एकत्र करण्याचा शासन निर्णय रद्द करावा : शालेय व्यवस्थापन समितीसह पालकांची रास्ता रोको आंदोलन करून मागणी.
—————————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड ):
नळदुर्ग ता. तुळजापूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद प्रशाला (माध्यमिक) तांत्रिक कारण दाखवून शासनाने दोन्ही शाळा एकत्र करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते सदर निर्णय हा चुकीचा असून मुलांच्या बुद्धिमत्तेवर परिणाम होऊन शैक्षणिक नुकसान करणार आहे तरी हा निर्णय शासनाने त्वरित रद्द करावा व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद प्रशाला (माध्यमिक) पुर्ववत स्वतंत्र ठेवाव्यात अशी मागणी शालेय व्यवस्थापन समिती जि.प.केंद्रिय प्राथमिक शाळा नळदुर्ग सह पालक वर्गातून येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून करण्यात आली आहे.
. सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मोफत व शक्तीचे करून प्राथमिक शाळा व माध्यमिक प्रशाला गावोगावी ठिकठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या शिक्षण विभागाने गेल्या अनेक वर्षापासून सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे गोरगरिबांच्या कुटुंबातील मुला मुलींना शिक्षणाची सोय झालेली आहे. नळदुर्ग येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ही मुल्यांकनामध्ये अत्यंत गुणवत्ता संपन्न असून मुलांच्या शिक्षणाचा पाया या ठिकाणी भर भक्कमपणे भरला जात आहे.त्यामुळे या शाळेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याना उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी कसलीच अडचण निर्माण होत नाही.जर केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद माध्यमिक प्रशाला एकत्र केल्या तर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकावर परिणाम होऊन त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. सर्व काही व्यवस्थित असताना शासनाने विनाकारण या दोन्ही शाळा एकत्र करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो चुकीचा असून तो निर्णय शासनाच्या शिक्षण विभागाने त्वरित मागे घेऊन
गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा शिवसेना (उबाठा) चे नळदुर्ग शहर प्रमुख संतोष पुदाले सह पालकांनी राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग बस स्थानकासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात रास्ता रोको आंदोलन करून केली आहे.
या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे केंद्र प्रमुख सत्यश्वर जाधव म्हणाले की पालकांच्या भावना लक्षात घेऊन शासनाकडे योग्य तो पाठपुरावा केला जाईल.
सदर निवेदन हे महसूल विभागाचे प्रतिनिधी म्हणून मंडळधिकारी डी.एम. काबळे यांनी स्वीकारले आहे.
या वेळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भास्कर मस्के सह पालक, कार्यकर्ते,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.







