Best News Portal Development Company In India

येडेश्वरी यात्रेतील भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना अटक !

येडेश्वरी यात्रेतील भाविकांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना अटक !
​तुळजापूर प्रतिनिधी : येरमाळा येथील प्रसिद्ध येडेश्वरी यात्रेदरम्यान भाविकांची वाट अडवून त्यांना लुटणाऱ्या आणि वाहने चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ आरोपींना ताब्यात घेतले असून १,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
​दिनांक १ एप्रिल ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत येडेश्वरी यात्रेसाठी आलेल्या भाविकांना आळणी शिवार आणि कुसळंब-धानोरा रोड परिसरात अडवून लुटण्याच्या घटना घडल्या होत्या. तसेच, येरमाळा शहरातून दोन मोटारसायकल देखील चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
​गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाचे आदेश दिले होते. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, सपोनि कासार व त्यांच्या पथकाने ११ एप्रिल २०२६ रोजी मोहा आणि आळणी येथून तीन संशयितांना ताब्यात घेतले व सविस्तर चौकशी सुरू केली.
​सखोल चौकशीदरम्यान आरोपींनी त्यांच्या एका साथीदारासह मिळून भाविकांना लुटल्याची आणि मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.
​पोलिसांनी खालील आरोपींना अटक केली आहे:
​आनंद शामराम पवार (वय २७ वर्षे, रा. आळणी)
​शुभम शामराव पवार (वय २५ वर्षे, रा. आळणी)
​बबन शहाजी काळे (वय २८ वर्षे, रा. मोहा, ता. कळंब)
​यांच्याकडून पोलिसांनी दोन सोन्याचे डोरले, एक मोबाईल आणि दोन मोटारसायकल असा एकूण १,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीचा एक साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
​ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकातील शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण व नागनाथ गुरव यांनी केली आहे. पुढील तपासासाठी आरोपींना धाराशिव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अशाच कर्तव्यदक्ष कारवायांमुळे धाराशिव ठाणे गुन्हे शाखा पोलीस जनसामान्यांच्या कौतुकास पात्र ठरत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india